-->
करमाळामाहिती विषयक

अफवेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

समाज माध्यमांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरल्यामुळे करमाळा शहरातील काही पेट्रोल पंपांवर मंगळवार दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनधारकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने काही ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते.

 

समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळासाठी पेट्रोल पंप परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, करमाळा तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा नियमित सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

तहसील प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे. पेट्रोल व डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्याने त्याची घरामध्ये साठवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गरजेपुरतेच इंधन घ्यावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पेट्रोल – डिझेलबाबत प्रशासनाचे आवाहन…

सध्या शासनाकडून किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल तुटवडा असल्याबाबत अथवा पुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अनावश्यकपणे पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. अशा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे.

— शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close