करमाळा प्रतिनिधी


गेल्या काही वर्षांपासून करमाळा शहरात वाहतुकीची नियमावली पोलिस प्रशासनाने ठरवून दिली होती. त्याबाबत शहरातील मुख्य रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी सम व विषम तारखेचे फलक हि लावण्यात आले होते. एकेरी वाहतुकी बाबत ही फलक लावण्यात आले होते. पहिले काही महिने याची कडक अंमलबजावणी पण करण्यात आली होती. हे नियम मोडणार्यां वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. मात्र तरीही बेशिस्त वाहन चालकांना पाहिजे तो लगाम बसलेला नाही.
शहरात रस्त्यावर कुठेही वाहन पार्किंग करून लोक बिनधास्त फिरत असतात, विशेष करून शहरातील मुख्य रस्त्यावरती तर प्रचंड प्रमाणात दुचाकी वाहने आडव्या तिडव्या लावलेल्या असतात. अगोदरच शहरातील मुख्य बाजारपेठेत अरुंद रस्ते असल्याने आणि त्यातच वाहनांची गर्दी यामुळं लोकांना पायी चालणे पण मुश्किल होत आहे.
मुख्य रस्त्यावरील बँक, मोठे हॉस्पिटल व अन्य व्यवसायिक दुकानासमोर तर पार्किंग चे नियम न पाळता जागा मिळेल तिथे वाहने लावली जातात. व्यापार पेठ असल्याने किराणा मालाचे मोठी दुकाने व त्यांना माल घेऊन येणारे मोठे ट्रक, टेंपो हेही रस्त्यातच उभी केली जातात. त्यामुळे तास न तास रस्ते जाम असतात. फेरीवाले, स्टॉल वाले यांच्यामुळे पण पादचार्यांना अडथळा निर्माण होतो. मुख्य रस्त्यावरील दुकानादार, बँका दवाखाने यांनी स्वतःची वाहन पार्किंग व्यवस्था करावी नाहीतर आपल्या ग्राहकांना तरी वाहन पार्किंगचे नियम सांगायला हवेत.
करमाळा बसस्थानकात भव्य पार्किंग व्यवस्था असून बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांनी आपआपली वाहन तिथे पार्क करायला हवीत. जर करमाळा नगर परिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त कार्यवाही केल्यास नक्कीच करमाळा शहरातील वाहतूक कोंडी सुटेल व नागरिकांना हि दिलासा मिळेल.




