
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने “पूरग्रस्तांना मदतीचा एक हात” या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू व औषधांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर चे महाव्यवस्थापक श्री चंद्रकांत दादा मोरे यांनी स्वतः ग्रामीण भागांना भेट देत पूरग्रस्तांना ‘स्वामींच्या प्रसादरूपी शिधा कीट’ चे वाटप केले. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी धीर दिला. तसेच पूरग्रस्तांशी हितगुज साधून त्यांना आधार देत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या आध्यात्मिक सेवा, बालसंस्कार, विवाह संस्कार, कृषी सल्ला, तसेच असाध्य व्याधींवरील सोपे उपचार याबाबत मार्गदर्शन केले.
मंगळवार, दि. १४ रोजी झालेल्या या वाटप कार्यक्रमात श्री. चंद्रकांत दादा मोरे, श्री. सतिश दादा मोटे, तसेच करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, खरेदी-विक्री केंद्राचे चेअरमन शंभूराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आणि आदिनाथचे संचालक ॲड. राहुल सावंत यांच्या उपस्थितीत बिटरगाव श्री, संगोबा आणि आळजापूर येथे या कीटचे वितरण केले.
या सेवाकार्यात करमाळा शहरातील गणेशनगर, श्री खोलेश्वर महादेव मंदिर, रंभापुरा, तेली गल्ली येथील सेवा केंद्रांचे सेवेकरी तसेच करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, वांगी नं.२, वीट, केतुर नं.२, खडकी, रायगाव, पांडे जेऊर, पांगरे व तालुक्याबाहेरील टेंभुर्णी, वेळापूर, माळशिरस, करकंब येथील सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.




