-->
करमाळामाहिती विषयकसामाजिक

सावडी फाटा ते दिवेगव्हाण रस्त्याचे काम अर्धवट; प्रवास करताना नागरिकांचे हाल

सरपंच, ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

सावडी फाटा ते दिवेगव्हाण या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत थांबले असून, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खडी व मुरूम रस्त्याच्या बाजूला गेले असून, रस्त्याच्या मधोमध खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने तसेच शाळकरी वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले आहे.

 

दररोज सकाळ-संध्याकाळ या मार्गावरून शेकडो नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्यातच आता काही दिवसांत परिसरातील साखर कारखाने सुरु होणार असून ऊस वाहतुकीचा हंगामही सुरू होईल. त्यामुळे मोठ्या ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रकच्या वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. या परिस्थितीचा सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी परिसरातील सर्व गावचे सरपंच व नागरिकांमधून होत आहे.

 

हा रस्ता राजुरी, वाशिंबे, दिवेगव्हाण, पारेवाडी, केत्तुर (१), केत्तुर (२), हिंगणी, पोमलवाडी या गावांना दळणवळणासाठी जोडणारा मुख्य मार्ग आहे. पारेवाडी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी हाच रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूप आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होणे हे अत्यंत गरजेचे आहे. शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा, तसेच वैद्यकीय आपत्कालीन सेवांसाठी हा रस्त्या खूप महत्त्वाचा आहे.

 

स्थानिक नागरिकांनी शासन व संबंधित कंत्राटदाराकडे मागणी केली आहे की, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या दुरुस्तीची उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांना व वाहनधारकांना होणारा त्रास काहीअंशी कमी होईल. गेल्या काही वर्षांपासून या भागातील रस्त्यांच्या कामांची गती अत्यंत मंदावली आहे. त्यामुळे आता नागरिकांना प्रशासनाकडून केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्षात काम अपेक्षित आहे.


“या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून अर्धवट अवस्थेत बंद पडलेले आहे. नागरिकांना याचा त्रास होत असून अनेक वाहनांचेही नुकसान होत आहे. संबंधित विभागाने आणि स्थानिक लोक प्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन काम मार्गी लावावे. अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.”

श्री. हनुमंत खाटमोडे, सरपंच प्रतिनिधी, दिवेगव्हाण.


ग्रामस्थांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा…

आमच्या सहनशक्तीचा अंत झाल्यास आम्ही शांत बसणार नाही. रस्त्याचे काम तातडीने सुरु झाले नाही, तर संबंध सर्व गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close