माय मराठी न्युज नेटवर्क


एक दोन वेळा नाही तर तब्बल ५०० पेक्षा जास्त वेळा सापाने चावा घेतल्याची आश्चर्यकारक घटना लातूर जिल्ह्यातल्या औसा इथून समोर आली आहे. या गावात एक अशी व्यक्ती आहे ज्याला आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त वेळा सापाने चावा घेतला आहे. कदाचित या गोष्टीवर सामान्यांचा विश्वास बसणार नाही, पण घटना खरी आहे.
लातुरच्या औसा शहरातील रहिवासी ४५ वर्षीय अनिल तुकाराम गायकवाड हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. मात्र, यांचं आयुष्य सापानी खडतर करून टाकलं आहे. कारण आतापर्यंत तब्बल ५०० वेळ सापाने चावा घेतल्याचा दावा अनिलने केला आहे. विशेष म्हणजे इतक्या वेळा साप चावूनही अनिल हा आपल्या आयुष्याच्या या शर्यतीत जोमाने टिकून आहे.
शेतात शेतमजूर म्हणून काम करताना अनेकदा अनिल गायकवाडला सापाने चावा घेतला आहे. इतकंच नाही तर शहरात अनेक माणसांच्या गर्दीत असतानाही साप नेमका त्यालाच चावतो. गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या काळात किमान ५०० वेळा अनिलला सापाने चावा घेतला आहे. धक्कादायक म्हणजे अनेकवेळा अनिलला उपचारासाठी ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं आहे.
अनिल गायकवाड यांच्यावर आत्तापर्यंत डॉ. सच्चिदानंद रणदिवे यांनी किमान १५० पेक्षा जास्त वेळा उपचार केले आहेत. डॉक्टरांनीही अनिल यांनाच साप का चावतो याच मोठं आश्चर्य वाटतं अस म्हटलं आहे. एकाच व्यक्तीला अनेक वेळा सर्पदंश होतो, ही खरच आश्चर्यकारक घटना आहे.




