माय मराठी न्युज


संपूर्ण देश १५ ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिनाची तयारी करण्यात व्यस्त असताना जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठ यश आले आहे. स्वातंत्र्य दिनी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या एका मोठ्या दहशतवादी संघटनेचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. जम्मु-काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या चार दहशतवाद्यांच्या एक दिवस अगोदरच मुसक्या आवळल्या आहेत.
जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी देशाच्या स्वातंत्र्य दिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण जम्मु-काश्मीर पोलिसांनी एक दिवस अगोदरच जैशच्या या कटाचा पर्दाफाश केला असून हल्ल्याची तयारी करत असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.
स्वातंत्र्यदिनी मोटरसायकलवर आयईडी स्फोटकांचा वापर करून हल्ला करण्याचा मनसुबा जैशच्या दहशतवाद्यांनी आखला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांना यात यश आले नाही. जम्मू-काश्मीरचे सुरक्षा दल गेल्या काही दिवसापासून दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवीत आहे. या अंतर्गत जम्मू पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांना अटक केली आहे. ते ड्रोनच्या सहाय्याने आणलेली हत्यारे आणि स्फोटके जमा करून ती जैशच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवून हल्ल्यात मदत करीत होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोटार सायकलला आयईडी स्फोटके लावून स्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता. तसेच देशातील इतर अनेक शहरांमध्येही ते रेकी करत होते.
पोलिसांनी सर्वात आधी मुंतजिर मंजुर या दहशतवाद्याला अटक केली असून तो पुलवामाचा रहिवासी आहे. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडून एक पिस्तुल, आठ राउंड काडतुसे आणि दोन चिनी हॅण्डग्रेनेड जप्त करण्यात आली आहेत. शस्त्रांची ने आण करण्यासाठी वापरण्यात येणारा एक ट्रक देखील पोलीसांनी जप्त केला आहे. मुंतजिरला अटक केल्यानंतर आणखी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
तोफिक अहमद शाह या शोपीया या जिल्ह्यात राहणाऱ्या दुसऱ्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानात बसलेले जैशचे कमांडर शाहिद आणि अबरार यांनी तोफिकला जम्मूला पोचण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला जम्मूत येऊन बॉम्बस्फोट करण्यासाठी मोटार सायकल खरेदी करण्यास सांगितले होते. यासाठी आयईडी ड्रोनद्वारे पाठविण्यात येणार होता पण त्याअगोदरच तोफिकला अटक करण्यात आली आहे. तिसरा दहशतवादी जहांगीर मोहम्मद भट देखील पुलवामाचा रहिवासी असून यालाही याच प्रकरणात अटक केली आहे. जहांगीर काश्मीरमधील एक फळ विक्रेता असून तो जैशचा कमांडर शाहिद याच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. तो काश्मिर घाटीत तरुणांना जैशमध्ये भरती करण्याचे काम करत होता.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दले सातत्याने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवत आहेत आणि त्यांचे कट उधळून लावत आहेत. या दरम्यान, दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त केली जात आहेत. दरम्यान, लष्कराने आयईडी देखील जप्त केले आहे.




