ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार!
कोल्हापूरच्या धर्तीवर ऊसदर देण्याची मागणी; २०२५ मधील अतिवृष्टी नुकसानभरपाई रखडल्याने शेतकरी आक्रमक

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे ऊसदर मिळावा आणि सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर नुकसानभरपाई तातडीने मिळावी, या मागण्यांसाठी शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह, करमाळा (कोर्टाशेजारी) येथे ही बैठक होणार आहे.
या बैठकीत प्रामुख्याने ऊसदर आणि अतिवृष्टी नुकसानभरपाई या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य आणि न्याय्य दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकरी वर्षभर कष्ट करून ऊस पिकवतात. मात्र, त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर ऊसदर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
दुसरीकडे, सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच नुकसानभरपाईची रक्कमही निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
पंचनामे पूर्ण झाले, लाभार्थ्यांची नावे निश्चित झाली आणि नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर झाली, तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील तर त्यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पात्र असलेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात येणार आहे.
तहसीलदारांना निवेदन; आंदोलनाचा निर्णय होणार
बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदार, करमाळा यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांची मते जाणून घेऊन सर्वानुमते पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि २०२५ मधील अतिवृष्टी नुकसानभरपाई सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला जाणार आहे. हा प्रश्न कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण शेतकरी वर्गाच्या हक्काचा आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी तसेच शेतजमिनी खरडून गेलेले शेतकरी यांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे.




