प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) येथील कु. गौरी विक्रमसिंह काटुळे या विद्यार्थिनीने जालना येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या २९ व्या राज्यस्तरीय ज्युनियर फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२१ या स्पर्धेत फाईल (तलवारबाजी) या प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. गौरी ही ॲड. विक्रमसिंह सुरेश काटुळे व ॲड. वैशाली विक्रमसिंह काटुळे यांची कन्या असून ती सोलापूर येथील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे.
करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करून यश संपादन केले आहे. तालुक्यातील वडशिवणे येथील भगवंत गणेश पवार या विद्यार्थ्याने एम बी बी एस परीक्षेत मोठे यश मिळविले असून तो हैदराबाद येथे प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळवणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. तसेच दिलमेश्वर गावचे सुपुत्र, गिर्यारोहक स्वप्निल दिलीप मोरे यांनी १७१७९ फूट उंचीचा शिखर सर करून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यानंतर आज शेलगाव (क) येथील गौरी काटुळे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत तलवारबाजी या प्रकारात सुवर्णपदकासाठी च्या सामन्यात निसटता पराभव स्वीकारत कांस्यपदक पटकावून करमाळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
गौरी काटुळे या विद्यार्थिनीला प्रकाश काटुळे सर दीपक शिंदे सर यांचे तसेच प्रशिक्षक पवन भोसले सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गौरीच्या या यशाबद्दल शेलगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीत तसेच मित्रपरिवारांमधून सर्वत्र कौतुक होत आहे.




