-->
करमाळाकृषी विषयक

आळसुंदे-वरकुटे शिवरस्ता शोधून रहदारीसाठी खुला करावा; या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील आळसुंदे येथील आळसुंदे- वरकुटे शिवरस्ता शोधून रहदारीसाठी खुला करून द्यावा. या प्रमुख मागणीसाठी मच्छिंद्र (राणा) सिताराम वाघमारे व आळसुंदे ग्रामस्थ आज सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ पासून आळसुंदे- वरकुटे शिवरस्त्यावर करमाळा कुर्डूवाडी रस्त्यालगत आमरण उपोषण करण्यासाठी बसले आहेत.

 

याबाबत अधिक माहिती देताना उपोषणकर्ते मच्छिंद्र वाघमारे म्हणाले की, आम्ही आळसुंदे येथील शेतकऱ्यांनी आळसुंदे- वरकुटे शिवरस्ता रहदारीसाठी खुला करून उपयोगात आणणेकामी करमाळा तहसील कार्यालयात अर्ज केला आहे. परंतु अद्याप पर्यंत यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता सदर शिवरस्ता ये-जा करण्यासाठी दाखवण्यात आला नाही. हा रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मंडल अधिकारी व तलाठी यांची तारीख मिळावी यासाठी दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्ज केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडून बंदोबस्ताची सशुल्क परवानगी मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी देखील दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी आळसुंदे- वरकुटे शिवरस्ता येथे हजर राहिले. परंतु यावेळी मंडल अधिकारी व तलाठी यांनी हा शिवरस्ता खुला करून देण्याचा आम्हाला अधिकार नाही असे तोंडी सांगितले. यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल दिला नाही. यामुळेच आम्ही आळसुंदे ग्रामस्थ आजपासून आमरण उपोषणाला बसलो असल्याचे त्यांनी सांगितले.

उपोषणापूर्वी त्यांनी माढा विभागाचे मा. उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी, मा. तहसीलदारसो करमाळा, मा. पोलीस निरीक्षक साहेब करमाळा तसेच भूमि अभिलेख कार्यालयाचे मा. उपअधिक्षक साहेब दिलेल्या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.

 

हा रस्ता खुला करून देण्यासाठी आम्हाला विनाकारण सशुल्क पोलीस बंदोबस्त मागवायला लावला. प्रशासनाच्या या चुकीमुळे आमचे आर्थिक नुकसान तर झालेच त्याचबरोबर शेतकरी व शाळकरी मुलांसाठी रस्ताही खुला करून मिळाला नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रशासनाकडून योग्य अधिकारी नेमून रस्ता मोजून व सदर रस्त्याची सीमारेखा आखून रस्ता खुला करून देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत.
मच्छिंद्र (राणा) वाघमारे,
उपोषणकर्ते, आळसुंदे

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close