निमगाव (ह) ते आवाटी रस्त्यावर अतिक्रमण; संबंधितांना जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडून फक्त नोटिसा, पण कारवाई मात्र शून्य
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मौजे निमगाव (ह) ते आवाटी ग्रा. मा. ३८ या रस्त्यांवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्त्याचे नुकसान केलेले आहे. या याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना नोटीस ही देण्यात आल्या आहेत. परंतु या या नोटीस देऊन एक महिना उलटला तरीही यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना कधी न्याय मिळेल.? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
निमगाव (ह) ते आवाटी या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना रीतसर नोटिस दिलेल्या आहेत. सदर नोटिसमध्ये अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे नुकसान केले असून रस्ता वाहतुकीस धोकादायक केला आहे. या रस्त्यावर अपघात झाला तर सर्वस्वी जबाबदार आपणास धरले जाईल याची नोंद घ्यावी. सदरची नोटीस मिळाल्यानंतर दहा दिवसात आपण केलेले अतिक्रमण काढून घ्यावे. जर आपण अतिक्रमण सदर कालावधीत न काढल्यास आपणावर कायदेशीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येईल असा उल्लेख आहे. परंतु या नोटीस देऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
या रस्त्यावरून वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या ग्रामस्थांना ये जा करावी लागते. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याची पाहणी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग करमाळा येथील शाखा अभियंता यांनी स्वतः भेट देऊन केलेली असतानाही अतिक्रमण करणाऱ्यांवर काहीच कारवाई केली जात नाही. या रस्त्यावर अपघात झाल्यावर किंवा काही तरी दुर्घटना घडल्यावरच बांधकाम विभागाला जाग येईल का? असा प्रश्न या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांकडून केला जात आहे.



