करमाळा प्रतिनिधी


“जगतापांची बाजारसमिती व पाटलांची आमदारकी घालवणाऱ्या बंडगरांच्या बंडखोरी ची चर्चा” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीत अजिबात तथ्य नसून व्यक्ती द्वेषाने पछाडलेल्या पाताळयंत्री लोकांचे मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे रोखठोक प्रतिपादन करत प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी आपले मौन सोडले.
याबाबत पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, सन २००६ साली व तसेच २०१२ झालेल्या बाजार समितीच्या निवडणूक वेळी बाजार समिती निवडणुकीत मदत करण्याच्या बदल्यात नारायण आबा पाटील यांना आमदारकी ला मदत करण्याचे खासगीत व जाहीर सभेतही घोषणा करणाऱ्या जयवंतराव जगताप यांनी सन २००९ व २०१४ साली शब्द न पाळता स्वतः विधानसभेला उभे राहिले. यावेळी तर कुणी बंडखोरी केली नव्हती ना? असा खडा सवाल बंडगर यांनी विचारला आहे.
जयवंतराव जगताप यांनी २०१९ ला तरी नारायण आबा पाटील याना कशावरून मदत केली असती? केवळ माझ्या भूमिकेचं भांडवल करून कुणाला तरी साळसूद ठरवायचं अन विनाकारण शिळ्या कढीला ऊत आणून एखाद्या ला बदनाम करायचं हे जनतेच्या लक्षात आले आहे.
मुळात जयवंतराव जगताप यांची बाजार समिती जायला इतर महत्त्वाची कारणे आहेत. त्याच्याकडे जाणून बूजून दुर्लक्ष केले जात आहे. पहिलं कारण म्हणजे युती शासनाने सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिलेला मताचा अधिकार सोसायट्यांच्या जिवावर बाजारसमित्या ताब्यात ठेवणाऱ्या मंडळींना यामुळे अडचणी आल्या. जयवंतराव जगताप यांचेही असेच झाले. एक लाखाहून अधिक शेतकर्याला मताचा अधिकार प्राप्त झाला. ज्या नेत्याचे मतदार संघावर वर्चस्व त्याच्या ताब्यात येण्याची संधी यामुळे निर्माण झाली. २०१८ साली करमाळा मतदार संघावर तत्कालीन आमदार नारायण आबा पाटील व रश्मी बागल यांचे वर्चस्व होते. त्यामुळे प्रत्येक जण स्वतंत्र लढला असता तर नारायण आबा व रश्मी बागल यांनाच जास्त संधी होती. हे सर्व ज्ञात आहे. परंतु पुन्हा एकदा नारायण आबांनी विषाचीच परिक्षा बघितली व जयवंतराव जगताप यांना पाठिंबा दिला. निकाल लागला अन् काठावरची परस्थिती निर्माण झाली. युतीचा म्हणा किंवा आघाडीचा धर्म म्हणून मी जयवंतराव यानाच सभापती करायला बांधील होतो. पण ०३ आक्टोबर २०१८ च्या पहाटेपर्यंत मी अभ्यास केला तेव्हा जयवंतराव जगताप हे अन्य संचालकाला सभापती करणार हे सिद्ध झाले. मी आदल्या दिवशी आमचे नेते नारायण आबा पाटील यांना भेटून या सर्व गोष्टीची कल्पना दिली. जयवंतराव जगताप सभापती होत नाहीत याची खात्री पटल्यानंतरच मी बागल गटाची ऑफर स्विकारली हेही बंडगर यांनी स्पष्ट केले.
बागल गटाबरोबर राहून बाजार समितीचे काम पाहत असताना नारायण आबा पाटील, जयवंतराव जगताप, पाटील गटातील माझे सहकारी यांनी अनेकदा विनंती करून मला स्वग्रही परतण्यासाठी आग्रह केला. म्हणून मी परत पाटील गटात आलो. त्याच दरम्यान जयवंतराव जगताप हे बाजार समितीच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहण्याची परस्थिती निर्माण झाली. सूडाचे राजकारण नको म्हणून जयवंतराव व नारायण आबा पाटील यांच्या व्यकीगत सूचनेवरून मी माझ्या अधिकारात जयवंतराव जगताप यांचा रजेचा अर्ज मंजूर केला व त्यांचे संचालक पद वाचले. याची चर्चा होताना दिसत नाही. केवळ बंडगरांची बंडखोरी दिसते.
जयवंतराव जगताप यांचं पद वाचवलं म्हणून आज ही बागल गट माझ्यावर बोट ठेवतो.bवास्तविक हा सगळा विषय वांगी गणातील पोटनिवडणुकीच्या वेळीच संपला आहे. कारण दत्तात्रय रणसिंग यांच्या प्रचारा दरम्यान वांगी नं-२ येथील सभेत मी स्वत याचा खुलासा केला. माझ्या निर्णयामुळे जयवंतराव जगताप व नारायण आबा पाटील यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली होती.
त्यानंतर जयवंतराव जगताप यांनी जेऊर ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सत्कार प्रसंगी बंडगर यांनी घेतलेल्या निर्णयावर पडदा पडला असून बंडगर हे माझ्या धाकट्या भावाप्रमाणे आहेत असे सांगितले होते. तसेच यापुढे नारायण आबा व आपण मिळून काम करणार असेही सांगितले होते.
अधिक बोलताना बंडगर म्हणाले की, जशी चर्चा २०१८ च्या बाजार समिती निवडणुकीची केली जाते. तशी सन २००० च्या ही निवडणूकीची का होत नाही असा खोचक प्रश्न ही बंडगर यांनी विचारला. त्यावेळी देखील भांडण होऊन ३०७, लुटालुट आदी गुन्हे दाखल झाले होते. सन २०१८ च्या बाजार समिती निवडणुकीची चर्चा करणारे त्यावेळी बाळुत्यात होते का? असा संताप ही बंडगर यानी व्यक्त केला. नारायण आबा पाटील यांच्या २०१९ च्या पराभवाची कारण मीमांसा करताना बंडगर म्हणाले की, नारायण आबा पाटील यांचा पराभव कुठल्या एका कारणामुळे नाहीतर अनेक कारणांमुळे झाला आहे.
पहिले कारण म्हणजे नारायण आबा पाटील यांना शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही हे होय. शिवसेनेला मिळणाऱ्या कट्टर लोकांचे मतदान आबाला झाले नाही.
दुसरे कारण म्हणजे चंद्रकांत सरडे, कन्हैयालाल देवी, दत्ता जाधव, विलास दादा पाटील व इतर सक्षम नेत्यानी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला.
तिसरे कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संजय शिंदे यांनी आपले मताधिक्य वाढवले.
चौथे कारण माढा तालुक्यातील ३६ गावात एकतर्फी झालेल्या मतदानाने संजय मामा शिंदे यानी मोठी आघाडी घेतली.
बाजार समितीतील घडामोडी चा जर परिणाम नारायण आबा पाटील यांच्या मतावर झाला असता तर ७३००० हजाराहून अधिक मते पडलीच नसती. यापूर्वी ही घडलेल्या अनेक घडामोडींचा कधी ही विधानसभा निवडणूकावर परिणाम झालेला नाही. मग २०१९ चाच कसा होऊ शकतो हे न समजणारे कोडे आहे.
वास्तविक आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो असा की, संजय मामा शिंदे जर खासदार झाले असते तर निसर्ग नियमाने त्यानी बागल गटाला पाठिंबा दिला असता. असं झालं असतं तर जयवंतराव जगताप यांचा पाठिंबा कुणाला मिळाला उघडपणे लक्षात येते. संजय मामांचा पराभव झाल्यामुळे व रश्मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने संजय मामांचा उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु नारायण आबा पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी असती तर जयवंतराव जगताप यांनी पाटील यांनाच साथ दिली असती.
या सगळ्या गोष्टीचा विचार करता बंडगर यांचा निर्णय नारायण आबा पाटील यांचा पराभवाला कसा कारणीभूत असू शकतो? तसं बघायला गेलं तर जयवंतराव बाजार समितीच्या आधी पासून संजय शिंदे यांच्या संपर्कात होते. याचाच परिपाक म्हणून संजय मामा समर्थक विलास दादा यांनी जयवंतराव साठी वांगी गणातून माघार घेतली होती. तसेच रायगाव गटात सुजित बागल यांना जगताप यांनी पाठिंबा दिला होता.
नारायण आबा पाटील हे आमचे श्रद्धास्थान त्यामुळे त्यांना आमदार करायचे आहे म्हणून रात्रीचा दिवस करणारा कार्यकर्ता मी आहे. १९९८ साली त्याना सभापती करण्यापासून सलग तेवीस वर्षे उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पाटलांसाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. अनेकदा जीवाची पर्वा न करता रात्री बारा, एक वाजता अकलूजला दुचाकीवरुन प्रवास केला. नोकरी सांभाळून रोज अकलूज-करमाळा करणारा कार्यकर्त्याने अनेकदा नारायण आबा पाटील यांच्यासाठी अनेकांचा रोष पत्करला आहे. प्रसंगी कुटुंबियांचा देखील विचार केला नाही. हजारो रूपयांचा चुराडा केला. ध्येय एकच आहे की नारायण आबा पाटील याना आमदार करायचं. तरीही बदनामी करण्यासाठी विनाकारण काही नतद्रष्ट मंडळी कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत.
बाजार समितीचा कारभार अनंत अडचणींना तोंड देत चांगला सुरू आहे. आमच्यावर टिका टिप्पणी करणारी करणाऱ्यांनी बाजार समिती कर्जमुक्त झाली आहे हे लक्षात घ्यावे. गतवर्षी उडदाची आवक महाराष्ट्रात अव्वल राहिली. हमालांना हमालीत वाढ दिली. कर्मचारी याना दोन महिन्याचा पगार बोनस म्हणून प्रत्यक्षात दिला जातो. कर्मचारी याना सातवा वेतन आयोग लागू केला. पेंट्रोल पंपाची उभारणी, गोडावूनची कामे प्रगतीपथावर आहेत. टीकाकाराने या गोष्टीकडे पण लक्ष द्यावं.
बाजार समितीचा सचिव नेमण्याचा विषय राजकीय असल्याने थोडासा संघर्ष झाला आहे. परंतु सर्वच काही बिघडल्याचा आरोप करणे म्हणजे निव्वळ दुष्ट हेतू लपून राहिला नाही. १२ ऑगस्ट रोजी त्याचाही निर्णय होणार असून त्यानंतर तात्काळ कर्मचारी पगार व इतर आर्थिक व्यवहार पूर्ण होतील.
बाजार समितीमध्ये नेहमीच जून, जुलै या महिन्यात आवक मध्यम स्वरूपाची असते. आता खरीप निघाल्यावर मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.
त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकरी हीत डोळ्यासमोर ठेवूनच कारभार चालू असून टीकाकाराने व्यक्तीद्वेष सोडून द्यावा. आम्ही आजपर्यंत समाजकारण आणि राजकारण करत असताना स्वतःला झोकून देऊन त्याग केलेला आहे. ढोकरी सारख्या वंचित गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी तीस वर्षे खर्ची घातलेली आहेत. उजनीच्या पाण्याची खालावल्यामुळे निर्माण होणारी समस्या असेल किंवा वीजकपातीच संकट असो न्याय मिळवून देत आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती करमाळा च्या माध्यमातून हजारो लाभार्थ्याना लाभ मिळवून दिला.
सामाजिक न्यायासाठी लढताना राज्यव्यापी चळवळी उभ्या केल्या. विद्यापीठ नामांतरा सारखी यशस्वी आंदोलने केली. शिक्षण क्षेत्रात काम करताना शेकडो विध्यार्थी, शिक्षक यांना न्याय मिळवून दिला. एवढा कामाचा डोंगर उभा केला असताना केवळ व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या लोकानी बाजार समितीच्या निमित्ताने बदनामी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागेल असा इशारा ही बंडगर यानी दिला आहे.



