
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात गुरूवार दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली भाजप संपर्क कार्यालय येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाली.
रॅलीदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. महिला, युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. विशेष आकर्षण ठरले ते कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक पद्धतीने केलेले लेझिम सादरीकरण.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना गणेश चिवटे म्हणाले की,“तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नाही, तर स्वातंत्र्य, बलिदान आणि एकतेचे प्रतीक आहे. युवकांनी राष्ट्रभक्तीचा दीप सदैव प्रज्वलित ठेवावा.”रॅलीमुळे करमाळा शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तिरंग्याला सलामी दिली, तर व्यापाऱ्यांनी दुकानासमोर फुले व पताका लावून स्वागत केले. या पदयात्रेमुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणखीनच वृद्धिंगत झाला.
या रॅलीसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, सरचिटणीस नितीन झिंजाडे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



