दहिगाव योजना बंद नलिकेचे काम चुकीचे मग वर्षभर विरोध का नाही केला? मा.आ. संजयमामा शिंदे यांचा आ. नारायण पाटील यांना थेट सवाल

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिकेचे काम माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत डिसेंबर २०२३ मध्ये सरकारी नियमानुसार सुरू झाले होते. हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत वर्षभर सुरू होते त्यावेळेस नारायण पाटील यांनी या कामाला विरोध का नाही केला ? तहसील कार्यालयाच्या हस्तांतरणाला विरोध म्हणून त्यांनी आंदोलन केले मग बंद नलिका वितरण प्रणालीचे सुरू असलेले काम चुकीचे होते तर मग त्या विरोधात आंदोलन का केले नाही ? असे प्रश्न उपस्थित करताना ही उपरती त्यांना आमदार झाल्यानंतरच का झाली या पाठीमागचे नेमके कारण त्यांनी जनतेला सांगावे असे आमदार नारायण पाटील यांना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी थेट आवाहन केले आहे.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना आहे. सरकारी धोरणानुसार या योजनेच्या बंद नलिकेचे काम सुरु आहे. माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आवर्तने देण्याचा मी प्रयत्न केला. सरकारी धोरणानुसार बंद नलिकेच्या कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामामुळे लाभक्षेत्रातील गावे वाढण्यास मदत होणार असून तसा प्रस्ताव सरकारकडे आहे. पाण्याची चोरी व पाणी बचत होऊन शेतीलाच त्याचा फायदा होणार आहे. विद्यमान आमदारांना जर ते काम चुकीचे वाटत असेल तर तसं लेखी पत्र त्यांनी शासनाला द्यावं. याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित करावा. सुरू असलेल्या कामाच्या विरोधात त्यांनी आंदोलन करावं. हे न करता ते काम बंद पाडणे, पाईप जाळणे याचे समर्थन करत असतील तर ही खेदजनक बाब आहे.
पुढे बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘मी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. कोणतेही, कोणाचेही काम हाणून पाडले नाही. राजकारणासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पाईप जाळणारे नेमके कोणाचे कार्यकर्ते आहेत? पोलिसांनी याचा योग्य तपास करावा.’
प्रवक्ते संजयमामांबद्दल जबाबदारीने बोला – ॲड. अजित विघ्ने
उचलली जीभ लावली टाळ्याला, घेतला खंडोबा आणि निघाली बाळ्याला असं व्हायला नको. प्रवक्ते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या बद्दल जबाबदारीने बोला. मा.आ. शिंदे यांनीही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनी त्यांच्या पूर्ण राजकीय कारकीर्दीमध्ये एक रुपयाही कमिशन कोणाकडून घेतलेले नाही हे सर्वसामान्य जनतेपासून ते ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यांना ज्ञात आहे. असे असतानाही संजयमामा शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचे हेतून त्यांच्यावरती बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. कमिशनचे आरोप जे करत आहेत त्यांनाच कमिशनची अपेक्षा आहे हे सर्व जनतेला माहित आहे.
दहिगावचे बंद नलिकेचे काम बंद पाडून योजनेच्या बाहेरील गावांवर अन्याय नको – सागर काळे
दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये देवळाली, झरे, सालसे, आळसुंदे, नेरले, रोपळे, मलवडी, पाथुर्डी इ. गावांचा समावेश नाही. ज्या गावांचा समावेश आहे तो अंशतः आहे म्हणून या गावांना फक्त ओहोरफ्लो चे पाणी मिळते. बंद नलीका वितरण प्रणाली द्वारे काम झाल्यानंतर ०.४६ टी. एम. सी पाण्याची बचत होणार आहे. या बचत झालेल्या पाण्यातून वरील गावांना पाणी मिळणार आहे. दहिगावचे बंद नलिकेचे काम बंद पाडल्यामुळे वरील गावांवर खऱ्या अर्थाने अन्याय होईल. विद्यमान आमदार जर सदर बंद पडलेल्या कामाचे समर्थन करत असतील तर या गावातील जनता त्यांना धडा शिकवील्याशिवाय राहणार नाही.



