शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज; करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


सध्याच्या काळात माणसाच्या आरोग्यावर आहाराचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे स्वतःचा आहार घेताना जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या फळे, भाज्या, अन्न धान्य सेवन करण्याची गरज आहे, त्यामूळे दवाखान्यावर जास्त खर्च होणार नाही व आरोग्य चांगले राहिल असे मत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मांडले.
रावगाव (ता. करमाळा) येथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून ‘मिशन विकसित गाव अभियान’ या प्रकल्पाअंतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर येथील एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांच्या गाव भेट अभ्यास दौऱ्यानिमित्त त्यांनी रावगाव येथे भेट दिली असता ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सेंद्रिय शेतीचे महत्व खूप मोठे आहे. पर्यावरणासाठी, मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी फायद्याचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपीकता टिकून राहते आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत नाही. प्रदूषण कमी होते, जैवविविधता वाढते, शेती करण्यास खर्च ही कमी लागतो. त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी कमीत कमी एक ते दोन एकर शेती सेंद्रिय पद्धतीने पिकविण्याची गरज आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबीरे करण्यास तयार आहोत.
यावेळी पाणी फाउंडेशनचे आशिष लाड यांनी गट शेती विषयी माहिती विषद केली. लक्ष्मण राख सर, एम एस डब्लूचे विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच संदीप शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, एपीआय बनकर साहेब, पोलीस कॉन्स्टेबल अलिम शेख, पोलीस पाटील संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप शिंदे- पाटील, रावगावचे पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, पै. दादा पवार, पप्पू बरडे, सुरेश फुंदे तसेच ग्रामविकास अधिकारी आर.के. हजारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटोळे सर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावकामगार कोतवाल बाजीराव पवार, प्रगतशील बागायतदार जयंत बरडे, विलास मुळे, इस्माईल शेख, शकील शेख तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्कर पवार यांनी केले तर आभार विजयकुमार नागवडे यांनी मानले.



