-->
करमाळाराजकिय

संजयमामांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे याचीच विरोधकांना पोटदुखी- ॲड. अजित विघ्ने

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशीच खरा जनाधार

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा विधानसभेत आणि आदिनाथ कारखाना निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे गट पराभुत झाल्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते यांनी आज केलेली टिका विजयाच्या उन्मादाने हुरळुन केलेली असून, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा गट आता तालुक्यात भक्कम झाल्याचेच स्पष्ट होत आहे. एकट्या संजयमामांना रोखण्यासाठी तालुक्यातील मातब्बर असणाऱ्या मोहिते- पाटील, जगताप, बागल आणि पाटील गटाला एकत्र यावे लागले, परंतु ही अभद्र युती फार काळाची नसेल. आजपर्यंत झालेल्या निवडणुका पाहता मामांचे मतदान वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकात हार जीत असतेच, परंतु विधानसभेनंतर माझी करमाळा तालुका हीच कर्मभूमी कायम राहील हा ठाम निर्णय मामांनी स्पष्ट केल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

 

मार्केट कमिटीच्या निवडणुकीत देखिल संजयमामांनी यापुर्वी चंद्रकांत सरडे यांना संधी दिली होती, केत्तुरचे राजेंद्रसिंह पाटील यांना दुध संघावर संधी दिली आहे. यापुर्वी विकासबापु गलांडे यांनाही मामांनी पदाची संधी दिलेली आहे. ॲड. राहुल सावंत यांना जिल्हा नियोजन समितीवर व अन्य कार्यकर्त्यांना विविध अशासकीय समित्यांवर मामांनीच पदे दिली आहेत. याशिवाय आजपर्यंत झालेल्या निवडणुकात कार्यकर्त्यांना बळ दिलेले आहे. भविष्यात देखिल होणाऱ्या निवडणुका शिंदे गट पुर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी फुकटचे सल्ले देण्याचे टाळून आता आदिनाथ कारखाना चालु करून शेतकरी सभासद व कामगारांना न्याय देण्याबाबत चिंतन करावे.

 

आदिनाथमध्ये निवडून आलेल्यांनी संगोबा येथे आदिनाथ महाराजांची घेतलेली शपथ लक्षात ठेवावी व कामकाज योग्य रित्या करावे. केवळ विषय दुसरीकडे वळवून मुख्य विषय बाजूला करण्याचे नेहमीचे तंत्र थांबवावे. आमचे नेते संजयमामा शिंदे हे सक्षम नेतृत्व असून भविष्यात नक्कीच पूर्ण ताकदीने करमाळ्याच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर राहतील याचा करमाळा तालुक्यातील जनतेला विश्वास आहे. तालुक्यातील अनेक युवक नेते मंडळी लवकरच संजयमामा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मामांच्या गटाची ताकद प्रत्येक निवडणुकीतून दिसुन येत आहे.

 

आदिनाथच्या निवडणुकीत देखिल जवळपास ७ हजार मतांपर्यंत एकट्याने मजल मारली आहे. झालेल्या मतदानापैकी ४१ टक्के मते संजय मामांना मिळाले आहेत तर चार गट आणि त्यांच्यासोबत एकत्र आलेले उपगट यांना मिळून फक्त ४८ % मतं आहेत यावरूनच कोणाची ताकद किती आहे हे दिसून येते. त्यामुळेच निवडून येऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही. आता आदिनाथ कारखाना व्यवस्थित चालवून दाखवावा हीच अपेक्षा आहे. त्यामुळे फुकटचे सल्ले देऊ नये असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close