आळसुंदे-वरकुटे शिवरस्त्यासाठी ग्रामस्थांकडून दुसऱ्यांदा आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील आळसुंदे वरकुटे शिवरस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आळसुंदे ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा करमाळा कुर्डूवाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतीसाठी पर्यायी रस्ता अथवा शिवरस्त्या विषयी ठोस आश्वासन दिल्याशिवाय रस्त्यावरून न उठण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहिल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनकर्ते राणा वाघमारे हे जेसीबी वर चढून शोले स्टाईलने आंदोलन करत असताना त्यांना खाली घेण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी आंदोलनस्थळी बोलविण्यात आली. तसेच आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाच्या वतीने ६० ते ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्ते व आळसुंदे ग्रामस्थ ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय रस्त्यावरून हटत नसल्याने दु. १ वाजता मा. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थी केली व त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असून पुन्हा एकदा आळसुंदे ग्रामस्थांना दि. १५ एप्रिल रोजी आळसुंदे व वरकुटे गावाचे गाव नकाशासह शिवरस्त्याची हद्दी व खुणा निश्चित करून शिवरस्ता खुला करून देण्याबाबतचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
या अगोदर ही आळसुंदे वरकुटे शिवरस्त्यासाठी आंदोलनकर्ते राणा वाघमारे यांच्यासह आळसुंदे ग्रामस्थ दि. २४ फेब्रुवारी रोजी शिवरस्त्यावरच आमरण उपोषणासाठी बसले होते. त्यावेळी प्रशासनाच्या मध्यस्थीने दि. २८ फेब्रुवारीला आळसुंदे वरकुटे शिवरस्ता खुला करण्यात येईल असे मा. तहसीलदार यांचेकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलकांनी २५ फेब्रुवारीला आपले आंदोलन स्थगित केले होते. परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने आज पुन्हा एकदा आळसुंदे ग्रामस्थांना रस्ता रोको आंदोलन करावे लागले.
यावेळी रास्ता रोको आंदोलनासाठी जोतीराम घाडगे, संजय धारेकर, शहाजी घाडगे, अभिमान घाडगे, श्रीकांत येवले, सचिन सरवदे, शहाजी देवकते, अशोक घाडगे, तात्या सरडे, आगतराव बेडकुते, गणेश टकले, किशोर शिंदे, रामराजे डोलारे, गणेश भांडवलकर, बालाजी घाडगे, रामभाऊ हांडे, गणेश देवकते, अतुल माने, नवनाथ सरवदे, गणेश माने, जयसिंग घाडगे, अक्षय घाडगे, परम मोरे, जयसिंग पाटील, नाना मोरे, अनिकेत घाडगे, राजू देवकते, आबा देवकते, महावीर घाडगे, श्रीराम पाडूळे, शुभम सपकाळ यांच्यासह महिला व आळसुंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम
• आंदोलन सुरू होण्यापूर्वीच साधारण ६० ते ७० पोलिसांचा फौज फाटा आंदोलनस्थळी तैनात
• सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात
• प्रशासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्रीमती काझी यांचा आंदोलकांची समजूत काढण्याचा जवळपास अडीच तास अयशस्वी प्रयत्न
• साधारण १ वाजता मा. तहसिलदार मॅडम शिल्पा ठोकडे यांची आंदोलनस्थळी भेट
• भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, आलसुंदे व वरकुते गावाचे तलाठी, मंडल अधिकारी, आंदोलक व ग्रामस्थ यांची ३ ते ४:३० वाजेपर्यंत संयुक्त बैठक
• बैठकीत तोडगा निघाल्यानंतर ५ वाजता मा. तहसिलदार मॅडम यांच्या सहीचे आंदोलकांना लेखी आश्वासन मिळाले.



