
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


रावगाव (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत योगिराज बरडे यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरातील पालापाचोळा, कागद व कचरा इत्यादींची होळी आज गुरुवार दि. १३ मार्च रोजी करण्यात आली. यावेळी शाळा चकाचक करून गोळा केलेला कचऱ्याचा ढीग पेटविण्यात आला.
याकामी रावगाव शाळेचे शिक्षक महेंद्र शिंदे सर, प्रताप राऊत सर, विद्या गंभीर मॅडम, रोहिणी चव्हाण मॅडम, रूपाली काळुंखे मॅडम, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्रथम सफाई, स्वच्छता केली व जमा झालेला कचरा एकत्र करून त्याची होळी केली. विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी कचरा इतरत्र न टाकता एका ठिकाणी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे किंवा कचरा निर्मूलन करणे तसेच प्रथम स्वच्छता करणे यासाठी शिक्षकांनी शाळेतील कचऱ्याची होळी करून एक नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला.
यावेळी होळी लहान करा पोळी दान करा, व्यसनापासून दूर रहा, झाडे लावा झाडे जगवा, वाचन करा ज्ञान वाढवा, होळी पेटू दे द्वेष मत्सर जळू दे, अशा घोषणांनी मुलांनी परिसर दणाणून सोडला.



