दहिगाव योजनेचे बंद पाडलेले काम सुरू न केल्यास जन आंदोलन उभे करणार; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांचा इशारा

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्याचा विकास करणे हे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना खुद्द लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच त्यांच्या सांगण्यावरून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे चालू काम बंद पाडत आहेत, योजनेचे पाईप जाळत आहेत हे दुर्दैव आहे. अशा प्रवृत्तीमुळे तालुका पुन्हा एकदा विकासापासून कोसो मैल दूर जाणार असल्याची खंत व्यक्त करतानाच सदर काम तात्काळ सुरू न केल्यास आपण मोठे जनआंदोलन उभा करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील पूर्व भागाची वरदायीनी म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेची ओळख आहे. या योजनेमुळे तालुक्यातील २४ गावातील १०५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. सदर योजनेच्या उजव्या व डाव्या चाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्व गावांना त्याचा अद्यापही फायदा होत नाही. तर काही गावातील बराचसा भाग योजनेमध्ये असूनही काम अपूर्ण असल्यामुळे पाण्यापासून वंचित आहे.
सदर योजनेचे १ वर्षांपूर्वी बंद नलिका वितरण प्रणालीचे काम माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सुरू केले होते. त्या कामामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या अनेक वर्षापासूनच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. सदर काम पूर्ण झाल्यास दहिगाव योजनेसाठी मंजूर असलेल्या १.८१ टीएमसी पाण्यापैकी ०.५० टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे दहिगाव योजनेच्या लाभक्षेत्रातील गावाव्यतिरिक्त देवळाली, झरे, मलवडी, वरकुटे, पाथुर्डी, रोपळे, हिसरे ही गावे ओलिताखाली येणार आहेत. असे असताना गेल्या २ महिन्यापासून सदर काम बंद पाडले आहे. या बंद असलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती वहिवाटीला अडचण येत आहे, चाऱ्या खोदलेल्या आहेत, पाईप शेतामध्ये पडलेले आहेत परंतु काम मात्र बंद आहे.
दहिगावचे काम बंद पाडण्याचे पाप विद्यमान आमदाराचेच- आशिष गायकवाड (देवळाली माजी सरपंच तथा आदिनाथ सह. साखर कारखाना माजी संचालक)
आमदारकीचा शपथविधी होण्यापूर्वीच देवळाली हद्दीत सुरू असलेले बंद नलिकेचे काम बंद पाडून संबंधित स्पोकलेन चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची बातमी समजल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी स्पोकलेन चालकाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून माझा मोबाईल नंबर त्यांना दिला. काम तुम्ही सुरू ठेवा जर नंतर कोणी बंद पाडायला आले तर मला संपर्क साधा असे त्यांना सांगितले. त्यानुसार २ दिवसांनी मला फोन आल्यानंतर मी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी साइटवर पोहोचलो. निंभोरे गावातील गोरख जाधव हा कार्यकर्ता आबांच्या सूचनेनुसार हे काम बंद ठेवायला सांगितले आहे असे सांगत होता. संबंधित कंपनीने नूतन आमदारांची भेट घ्यावी त्यानंतर काम सुरू करावे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तुर्त काम बंद ठेवायला आपण सहमती दर्शवली. हे भेटतील नंतर मात्र माझ्या गावाच्या हद्दीत असली गुंडगिरी मी खपवून घेणार नाही असे मी बोललो. या गोष्टीला आज ३ महिने होत आले, परंतु अद्यापही काम सुरू झालेले नाही. हे काम बंद पाडण्याचे, पाईप जाळण्याचे पाप विद्यमान आमदाराचेच असल्याची घणाघाती टीका गायकवाड यांनी केली.



