
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


पुनवर (ता. करमाळा) या दुष्काळी गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला कु. निलेश भारत धुमाळ हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक परीक्षेत ४०० पैकी २५४ गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाला आहे. निलेश या शेतकरी पुत्राने नोकरी करीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे.
निलेश याचे प्राथमिक शिक्षण पुनवर येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण लोणी मसदपुर (ता. कर्जत) येथे घेतले तर उच्च माध्यमिक शिक्षण शास्त्र विभागातून इंदापूर येथे पूर्ण केले. तसेच कडेगाव सांगली येथे बी. एससी (ॲग्री) व त्यानंतर कोल्हापूर येथे एम एस सी (ॲग्री) पदवी घेतली. अशा विविध ठिकाणी शिक्षण घेत असताना तो नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असे, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने २०१६ ते २०२५ या नऊ वर्षातील काही काळ राहुरी विद्यापीठात राहून अभ्यास सुरू केला, परंतू सतत दोन-चार गुणांनी अपयश येत असतानाही त्यांने निराश न होता सातत्याने नव्याने परीक्षेची तयारी करत असे.
निलेशला दुष्काळी भागातील असल्याने कुटुंबात आर्थिक अडचणी येत असे, त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये बारामती येथे NIASM मध्ये रिसर्चर म्हणून नोकरी केली तेथील दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागात पुणे येथे सहाय्यक म्हणून काम केले. अशा विविध ठिकाणी काम करून आर्थिक गरजा पूर्ण करत असतानाच दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत झालेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून एका शेतकऱ्याच्या मुलाची महसूल सहाय्यक पदी निवड झाली.
निलेशला विविध ठिकाणी शिक्षण घेताना आलेल्या अडचणी, स्पर्धा परीक्षा कालावधीतील अपयशाशी सुरू असलेली झुंज आणि वाढत्या वयात कौटुंबिक जबाबदाऱ्या व दबाव या सर्व गोष्टींवर मात करून त्याने त्याचे स्वप्न जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण केले आणि त्यामुळेच आज शेतकऱ्याच्या घरी सुवर्णक्षण पाहायला मिळाला आणि निलेश च्या आयुष्यातील सुरु असलेला संघर्ष कायमचाच संपला.
या यशामुळे नातेवाईकांमधून, मित्र परिवाराकडून आणि पंचक्रोशीतून निलेश व त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच अशा संघर्षमय प्रवासातून यश प्राप्त करणे हे इतर तरुण मुला-मुलींसाठी खूप प्रेरणादायी आहे हे नक्की!



