
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा शहर विकासासाठी २१ कोटी ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला असून या सर्व कामाचे अंदाजपत्रक तयार करून ठराव निश्चित करून घ्यावेत. असे आदेश नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबई येथे नंदन बंगल्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. यामध्ये शहरातील सर्व बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण करणे, रोड डिव्हाइडर करणे, श्रावण नगर, गणेश नगर, मुथा नगर, शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते, सर्वत्र नवीन स्ट्रीट लाईट, नगरपालिकेच्या ओपन पेस मध्ये वृक्षारोपण, करमाळा शहर ते देवीचा माळ रोड सुशोभीकरण असा सर्व एकत्रित प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ स्वाक्षरी करून प्रस्ताव मागून घ्या असे आदेश नगर विकास सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांना दिले आहेत.
सुधारित पाणीपुरवठा योजना अमृत टू जलशुद्धीकरण प्रकल्प व भुयारी गटार योजना याचा शासन दरबारी ३२० कोटी रुपयांचा प्रस्ताव पडून असून या कामातील कागदपत्रांच्या त्रुटी दूर कराव्यात तसेच त्या जागा संपादित करून करमाळा येथील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तात्काळ उपायोजना करा. असे आदेश नगर विकास सचिवांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.



