-->
करमाळाक्राईमराजकिय

अवैध वाळु उपसा बंद करा; आमदार नारायण पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू आहे. दिवसेंदिवस या अवैधरित्या वाळु उपशाचे प्रमाण वाढत चालले असून हा अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा. अशी मागणी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारीसो यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील वांगी, चिखलठाण, खातगाव, येथे अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याच्या तक्रारी महसूल विभाग व माझ्याकडे येत आहे. गेल्या वर्षापासून करमाळा तालुक्यातील सीना नदी, भीमा नदी व उजनी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून तालुक्यातील रस्ते खराब होऊ लागले आहेत. तसेच सदर वाळू उपसा हा शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिवसरात्र सुरु आहे. उजनी धरणातील लाखो ब्रास वाळू माफिया उचलत असल्यामुळे शासनाचा महसूल (रॉयल्टी) बुडत आहे. पोलिसांची व महसूल विभागाचे अधिकारी यांची भूमिका माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा असून अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.

 

वाळू माफिया हे असून साम, दाम दंडासह लोकांना धमकावून, आर्थिक तोड-पाणी करून गावागावात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे गावातील सलोखा बिघडत चालला आहे. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात वाळू माफियांचा उघड वावर असल्याचे लोक खाजगीत बोलत आहेत. अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफीयांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. अवैध वाळू वाहतुकीमुळे करमाळा तालुक्यातील रस्ते खराब होत असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासनाचे रस्ते दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. एका बाजूला उजनी पर्यटनासाठी शासन प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास हे वाळू माफिया करत आहेत. करमाळा तालुक्यातून उजनी धरणातील अवैधरित्या वाळू उपसा माफियावर योग्य कारवाही करावी.

 

करमाळा तालुक्यात गेली दीड दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या सीना नदीतून तसेच भीमा नदी पात्र व उजनी धरणातून हा अवैधरीत्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वाळू माफीयांची दहशत या भागात वाढली असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वाळू उपसा करत असताना दमदाटी करणे, धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच वाळू उपसण्यावरून मागील काही दिवसापूर्वी करमाळा तालुक्यात जीव घेणे हल्ले झाले आहेत. मात्र याबाबत पोलिस व महसूल अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेचे दिसून येत नाही.

 

विधानसभा निवडणूक झाल्यापासून माझ्याकडे वाळू उपसा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. गेली दोन-तीन वर्षापासून वाळू उपसा सुरू असून या वाळू उपशातून अनेक तंटे निर्माण होत आहेत. शासनाचा महसूल बुडत आहे, रस्ते खराब होत आहेत तसेच यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वाळू उपशाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करून हा वाळू उपसा बंद झाला पाहिजे. तसेच वाळू माफिया यांचेवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करून उपसा बंद झाला नाही तर याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.

श्री. नारायण पाटील, आमदार, करमाळा.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close