-->
करमाळाराजकियविशेष

पोलीस प्रशासना विरोधात सोमवार पासून धरणे आंदोलन; शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांचा इशारा

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या बोध वाक्याचा पोलीस प्रशासनास विसर पडला असून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीकडे ठाणे अंमलदार, बिट हवालदार दुर्लक्ष करत आहेत. यामुळे सोमवार दि. २३ सप्टेंबर पासुन करमाळा पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी दिला आहे.

 

या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की, पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा दाखवताना अवैध धंदेवाईक व ठरावीक राजकीय नेत्यांचे चेले चपाटे यांची मात्र बडदास्त ठेवली जात आहे. तसेच करमाळा तालुक्यातील अनेक गावातून अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत त्यांचे पालक पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत त्या पालकांनाच “नको ते बोलून इज्जत काढली जात आहे.” अनेक महिलांच्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अनेकांचे मोबाईल चोरले आहेत मात्र गहाळ झाल्याचा अर्ज घेऊन गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सिसीटिव्ही फुटेज असून देखील कोणताच तपास लागत नाही.

 

पोलीस ठाण्यात तक्रार किंवा अर्ज घेऊन येणाऱ्यांचा गुन्हा नोंद करून घेणे हे ठाणे अंमलदार यांचे कर्तव्य असते परंतू ठाणे अंमलदार तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तक्रारदारालाच दमदाटी करतात. तसेच विचारणा करण्यास गेलेल्या पत्रकार तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना बिट हवालदार व ठाणे अंमलदार उलट सुलट भाषा वापरत आहेत. बिट हवालदार यांनी प्रत्येक बिटमध्ये स्थानिक भागातील अवैध धंदेवाले यांनाच आपले (एजंट) पंटर बनवले असून त्यांचा बिटमध्ये हस्तक्षेप वाढला आहे. ठराविक राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा पोलीस निरीक्षक कार्यालयात वावर दिसून येत आहे. ठाणे अंमलदार, बिट हवालदार यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतर देखील कोणतीच चौकशी न करता अर्जास केराची टोपली दाखवली जात आहे असे फरतडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

या निवेदनावर उपतालुकाप्रमुख अ‍ॅड. विकास जरांडे, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, विभाग प्रमुख बालाजी वाडेकर, शिवाजी नाईकनवरे, सोमनाथ पोळ, बालाजी देवकर, बंडू डोळस, शिवाजी लोंढे, भाऊराव मस्तूद, अविनाश गाडे आदींच्या सह्या आहेत. 

 

निवेदनकर्ते व पोलीस निरीक्षक यांच्यात शाब्दिक बाचाबाची

पोलीस प्रशासना विरोधात असलेले निवेदन पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा चांगलाच पारा चढला, एक दिवस पोलीसांच्या जागेवर बसून बघा..पालकांना मुलींवर लक्ष ठेवता येत नाही का? ऊसवाहतुकदार काय झोपेत असतात का ? असे प्रश्न केल्यानंतर युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी देखील आक्रमक भुमिका घेत पोलीसांच्या याच भुमिके विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, तुम्ही फक्त निवेदन स्विकारा असे सांगितले. त्यानंतर पोलीस व पत्रकार यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण निवळले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close