
माय मराठी न्यूज नेटवर्क


झरे (ता. करमाळा) येथील अंगणवाडी क्र. १६ ही ईमारत अज्ञात इसमानी एका रात्रीत भुईसपाट करून अज्ञाताने त्याचा ढिगाराही रातोरात गायब करून खळबळ माजवली आहे. याबाबत तब्बल दोन महिने उलटले तरीही साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. अद्याप याचा तपास लागत नसल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २० एप्रिल २०२४ रोजी अज्ञात इसमाने एका रात्रीतच भरमध्यवस्तीत असणारी अंगणवाडी भुईसपाट करून अंगणवाडीतील मुलांच्या साहित्यासह सर्वच माती दगडाचा ढिगारा गायब करून अंगणवाडीचे अस्तित्व होते की नव्हते करून टाकले. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला माहिती आहे अशी चर्चाही ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या ठिकाणी भरणारी अंगणवाडी, लहान मुलांचा किलबिलाट गेल्या दोन महिन्यापासून हवेतच वीरून गेला आहे. याबाबत प्रशासनाकडून काहीच गांभीर्य व्यक्त होत नसून चक्क लाखो रुपये खर्चून २०१२-१३ साली उभारलेली अंगणवाडी चक्क गायबच केल्याने प्रशासनाच्या प्रामाणिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
झरे येथील अंगणवाडी क्र. १६ ही गावातील चिमुकल्यांनी भरत होती. दररोज या ठिकाणी मुलांचा किलबिलाट झरे ग्रामस्थांना सुखावत होता. मात्र २० एप्रिल २०२४ रोजी अज्ञात इसमाने ही अंगणवाडी भुईसपाटच करून टाकली. एवढेच नव्हे तर त्याचा ढिगारा ही रातोरात गायब केल्याने सकाळी त्या मुलांना शाळा दिसेनाशी झाली. ग्रामस्थ ही या प्रकाराने चक्रावून गेले. याची माहिती अंगणवाडी मदतनीस शैला औदुंबर मोरे यांनी फोनद्वारे पर्यवेक्षकांना कळवली. त्यानंतर २२ एप्रिल रोजी लेखी पत्राद्वारे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. विनापरवानगी ही इमारत पाडल्याने झरे येथील बेकायदेशीर कारभाराचा कळस झाला असून ही घटना कोणीही गंभीरपणे घेत नाही. प्रशासनही याकडे धिम्मपणे पाहत आहे. स्थानिक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी याबाबत सर्वत्र तक्रारी केल्यानंतर इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही इमारत पाडण्यामागे अज्ञाताचा हेतू काय होता हे उघड झाले नसून पोलीसांच्या तपासात ही बाब उघड होईल अशी आशा ग्रामस्थांना आहे.
याबाबत घटनास्थळाचा बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक यांनी गावातील स्थानिक लोकांच्या समक्ष पंचनामा केला होता. त्या ठिकाणी इमारतीचे अवशेष साहित्य याचा लवलेशही नव्हता तर या ठिकाणी भरणारी अंगणवाडी हे इतरत्र भरण्यासाठी पर्यवेक्षकांना आदेश देण्यात आले होते. प्रहार संघटनेचे सोमनाथ जाधव यांनी ही इमारत पाडू नये यासाठी प्रशासनाला सतर्क केले होते. दुसरी अंगणवाडी उभारल्याशिवाय ही अंगणवाडी पाडू नये तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व विद्यार्थी यांचा विचार करून निर्णय घ्यावा. असे लेखी पत्र प्रशासनाला दिले होते. तरीही अज्ञाताने विनापरवानगी ही इमारत नेस्तनाबूत केली.
दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून अंगणवाडी इमारत नसल्याने चिमुकल्या बाळांचा मात्र हिरमोड झाला असून हक्काच्या इमारतीत ही अंगणवाडी भरत नाही. याचे शल्य ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. याचा कसून तपास होऊन या प्रकारामागे असणारे सत्य बाहेर काढून संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
झरे येथील अंगणवाडीची इमारत परवानगी न घेता अज्ञात इसमानी भुईसपाट करून त्याची विल्हेवाट लावली आहे. याबाबत करमाळा पोलिसांमध्ये लेखी पत्राद्वारे तक्रार दिलेली आहे. अद्याप त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने त्याचा तपास होणे व संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे. सध्या इमारत पडल्याने अंगणवाडी ही मंदिरात भरत आहे. याबाबत लवकरच गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास होईल.
श्री. आनंद जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी, करमाळा
इमारत विनापरवानगी पाडली आहे ही वस्तुस्थिती आहे. इमारत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मालकीची असल्याने त्यांच्याकडे याबाबत अहवाल दिला असून त्यांनी याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. सध्या त्यांनी पोलिसात पत्राद्वारे तक्रार दिली आहे. लवकरच तपासात सत्य बाहेर येईल.
श्री. मनोज राऊत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, करमाळा
२१ एप्रिलच्या रात्री अंगणवाडीची इमारत पाडून त्यातील साहित्यासह ती गायब केली होती. याबाबत १४ एप्रिल २०२४ रोजी अंगणवाडी पाडणार असल्याची आपण लेखी तक्रार ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. त्यावेळी त्यांनी मला पोहच दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी मला २९ एप्रिल रोजी पोहोच दिली आहे. अंगणवाडी पाडण्याची गावांमध्ये चर्चा असताना याची आगाऊ कल्पना मी त्यांना दिली होती. यावर त्यांनी काहीच कारवाई न करता ते चुपचाप बसले. त्यामुळे अज्ञातांनी ती इमारत एका रात्रीत भुईसपाट करून अंगणवाडी ची विल्हेवाट लावून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. स्वतःची इमारत भुईसपाट केल्याने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना इतरत्र बसावे लागत आहे. याचा गांभीर्याने तपास होणे आवश्यक आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
सोमनाथ जाधव, तालुका उपाध्यक्ष, प्रहार संघटना, ता. करमाळा.



