
माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


मांगी (ता. करमाळा) येथील दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालयामध्ये आज मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी पुस्तकांची गुढी उभा करून मराठी नववर्ष दिन गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले की, ग्रामीण भागातील दोन मजली इमारत असलेलं करमाळा तालुक्यातील हे एकमेव प्रशस्त ग्रंथालय असून या ग्रंथालयाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त गावातील नागरिकांना, तरुणांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून वाचन परंपरेच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाचनाची गुढी हा उपक्रम आज आम्ही राबविला.
दिग्वीजय बागल सार्वजनिक वाचनालयाची स्थापना १९९७ मध्ये झाली असून सध्या वाचनालयाला ब वर्ग मिळालेला आहे. वाचनालयात १०००० ग्रंथ संपदा उपलब्ध असून यावर्षी वाचनालयाला २५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. हे ग्रामीण भागामधील एकमेव ब वर्गाचे वाचनालय असून वाचनालय मध्ये गावातील तरुणांना अभ्यास करण्यासाठी ३० विद्यार्थ्यांची स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे. तसेच वाचनालयाच्या परिसरामध्ये प्रसन्न वातावरण तयार करण्यात आलेलं आहे.




