-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांचेसह १७ संचालकांवर गुन्हा दाखल करणेचे कोर्टाचे आदेश

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

आळजापूर (ता. करमाळा) येथील शेतकरी समाधान शिवदास रणसिंग यांनी करमाळा न्यायालयात दाखल केलेल्या खाजगी फिर्यादी वरून करमाळा येथील न्यायालयाने मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालिक चेअरमन दिग्विजय बागल यांचेसह १७ संचालकांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणेचे आदेश दिले आहेत. अशी माहिती फिर्यादीचे वकील ॲड. अनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, फिर्यादी शिवदास रणसिंग यांनी मकाई साखर कारखान्यात त्यांचा ऊस दि. २८/११/२०२२ ते दि. ०५/१२/२०२२ या कालावधीत गाळपासाठी दिला होता. या ऊसाचे बील कारखान्याने दिले नाही म्हणून यातील तक्रारदार यांनी मा. तहसिलदार, मा. जिल्हाधिकारी, मा. साखर आयुक्त, मकाईचे कार्यकारी संचालक तसेच करमाळा पोलिस स्टेशन व मा. पोलिस अधिक्षक साो. सोलापूर यांचेकडे तक्रार केलेली होती. तरी याबाबत कसलीही कायदेशीर कारवाई न झाल्याने यातील फिर्यादी यांनी करमाळा येथील मे. न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सी.आर.पी.सी. १५६/३ चा दिवाणी व फौजदारी न्यायाधिश श्रीमती भोसले मॅडम यांनी आदेश दिला आहे.

सन २०२२-२०२३ या गळीत हंगामामध्ये श्री. मकाई सहकारी साखर कारखाना व सहकारी कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले आजपावेतो देण्यात आलेली नाही. तसेच या संदर्भात वेळावेळी कारखाना व्यवस्थापन, पोलिस निरीक्षक करमाळा पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यासह इतर कार्यालयाकडे यातील फिर्यादी यांनी वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले होते. तसेच आंदोलने, उपोषणे करुनही रक्कम मिळाली नसल्याची तक्रार अर्जदाराची होती. सदर बाब न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी दाखल घेण्यात आली व तत्कालीक अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह तत्कालीक संदस्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१७-१८ ते २०२२-२३ या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले संचालक संबंधित कारखान्यावर कामकाज करीत होते, त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी फिर्यादी तर्फे करण्यात आली होती.


• ‘या’ संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश •

तत्कालीन चेअरमन दिग्विजय दिगंबर बागल, उत्तम विठ्ठल पांढरे, महादेव निवृत्ती गुंजाळ, नंदकिशोर विष्णुपंत भोसले, गोकुळ बाबुराव नलवडे, बाळासाहेब उत्तम सरडे, महादेव त्रिंबक सरडे, सुनील दिगंबर शिंदे, रामचंद्र दगडू हाके, धर्मराज पंढरीनाथ नाळे, नितीन रामदास राख, रंजना बापू कदम, उमा सुनील फरतडे, राणी सुनील लोखंडे, संतोष साहेबराव पाटील, दत्तात्रय महाळ् गायकवाड, हरिश्चंद्र प्रकाश खाटमोडे (कार्यकारी संचालक) तसेच मकाई सहकारी साखर कारखाना या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी मयत संचालक वगळून उर्वरित संचालकांवर सदरची कारवाई करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत.


ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे कलम ३ नुसार तसेच जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ नुसार गाळपास आलेल्या ऊसाचे पिकाचे रास्त व किफायतशिर मोबदला रक्कम (एफ आर पी) संबंधित शेतकऱ्यास १४ दिवसात देणे आवश्यक असताना मकाई कारखान्याचे चेअरमन व संचालक यांनी शेतकऱ्याला ऊसाचे बिल न देता स्वतःहाच्या हितासाठी बेकायदेशीरपणे वापरले. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केले आहे म्हणून न्यायाधिश भोसले यांनी सी. आर. पी. सी. कलम १५६ (३) प्रमाणे करमाळा पोलिस निरीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करुन कलम १७३ प्रमाणे त्याचा अंतिम अहवाल न्यायालयात दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

 

मकाई साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी आम्ही मोर्चा, धरणे आंदोलन, बोंबाबोंब आंदोलन, आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. यामध्ये शेतकरी कामगार संघटनेचे दशरथ आण्णा कांबळे, कामगार नेते ॲड. राहुल सावंत, राजेश गायकवाड, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे व शेतकरी बांधवासह लढा देत होतो. आमचे सहकारी शेतकरी समाधान रणसिंग यांनी कोर्टात दाद मागितली असता कोर्टाने न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करत असुन पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

प्रा. रामदास झोळ,  संस्थापक/अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close