
माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


उस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात यावे. या मागणीचे निवेदन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह उस वाहतूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना सादर केले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, शहरप्रमुख संजय शिंदे, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, युवासेना शहरप्रमुख समिर हलवाई, युवासेना समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, शिवाजी नाईकनवरे, राजेंद्र गव्हाणे, विभाग प्रमुख सोमनाथ पोळ आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवासेना तालुकाप्रमुख शंभू फरतडे म्हणाले कि, ४ डिसेंबर रोजी युवासेनेकडुन या मुद्द्यावर घंटानाद आंदोलन झाल्यानंतर जवळपास चाळीस गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, याचा सखोल तपास करून फसवणूक करणारे मुकादम व टोळीतील आरोपी यांच्या मुसक्या आवळल्या तरच ऊस वाहतूकदारांना खरा न्याय मिळेल, त्यामुळेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरू राहिल असे शंभू फरतडे यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शक्य तेवढा जलद तपास करून कारवाई करू तसेच आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांचे देखील गुन्हे दाखल करून घेतले जातील असे आश्वासन दिले. या निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक यांना देण्यात आली आहे. यावेळी बहुसंख्य उस वाहतुकदार, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.





