
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायं. ०६:०० वा. या गोरज मुहूर्तावर भव्य-दिव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. तसेच याची सर्व पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, श्रीराम प्रतिष्ठान दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत असते. याचाच भाग म्हणून गत वर्षी २१ जोडप्यांची सामुदायिक लग्न लावून देण्यात आली होती. ही परंपरा कायम ठेवत यावर्षी ३१ जोडप्यांचा विवाह भव्य दिव्य अशा वातावरणात पार पडणार आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खालीलप्रमाणे तयारी करण्यात आली आहे.
♦ मंडप व्यवस्था:- या लग्न सोहळ्यासाठी भव्य मंडप व्यवस्थेचे नियोजन केले असून वऱ्हाडी यांना आरामात बसण्याची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ३१ जोडपी व त्यांचे कुरवले, मामा-मामी यांच्यासाठी भव्य मजबूत स्टेज निर्माण करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी नव वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर येणार असून त्यांची वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वधू वरांचे मामा-मामी व आई-वडील यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. विवाहस्थळी उच्च प्रतीचे साउंड सिस्टीम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच करमाळा शहरात विविध ठिकाणी वऱ्हाडीच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच वऱ्हाडीच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा लावण्यात आला आहे.
♦परण्याची व्यवस्था:- सर्व वरांचे परणे काढण्यासाठी भव्य तयारी करण्यात आली असून सर्व ३१ वरासाठी घोडे, उंट यांची व्यवस्था करण्यात आली आहे. २ बेंजो वाद्याच्या गजरात घोडे, उंट यावरती बसून फटाक्यांच्या आतषबाजीत वरांची करमाळा शहरातून वरात काढण्यात येणार आहे. यावेळी वरांना श्रीराम भक्त हनुमान यांचे दर्शनासह श्री. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही आशीर्वाद घेता येणार आहेत.
♦जेवण व्यवस्था:- ३१ नववधूवरांच्या गावाकडील वऱ्हाडी, त्यांचे सर्व पै-पाहुणे, मित्र-परिवार तसेच करमाळा शहर व तालुक्यातील सर्व मान्यवर यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. या सर्वांची जेवणाची व्यवस्था विवाहस्थळी करण्यात आली असून सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था स्वतंत्र कक्षात करण्यात आली आहे. यामध्ये १५ हजार वऱ्हाडींना भात, भाजी, पुरी, मटकी, बुंदी या जेवणाचा आस्वाद मिळणार आहे.
♦शुभाशीर्वाद:- सर्व नववधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत. यामध्ये वारकरी सांप्रदायातील अनेक नामांकित महाराज मंडळी व वरिष्ठ पातळीवरील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
♦वधूवरांना स्वतंत्र जानवसे:- विवाहस्थळी वधूवरांना स्वतंत्र जानवस घरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे त्यांना विवाहपूर्व तयारीसाठी प्रायव्हसी मिळणार आहे. तसेच प्रत्येक जोडप्यासाठी एका मदतनीसाची श्रीराम प्रतिष्ठान तर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
♦भेटवस्तु:- प्रत्येक वधूवरांना संसार उपयोगी अनेक भेटवस्तु देण्यात येणार आहेत. यामध्ये सोन्याचे मणी मंगळसूत्र, भांडी सेट, नवरीला दोन साड्या, चप्पल, मेकअप साहित्य किट, नवरदेवाला सफारी व एक ड्रेस, बूट इत्यादी भेटवस्तु देण्यात येणार आहेत. या विवाह सोहळ्यात नव वधुवरांच्या इच्छा व अपेक्षा नक्कीच पूर्ण करण्यात येणार आहेत.
श्रीराम प्रतिष्ठान गेली तब्बल १३ वर्षे करमाळा शहरातील गोरगरीब गरजू वृद्ध लोकांना दोन वेळेचे ताजे भोजन देत आहे. याबरोबरच बाहेर गावाहून करमाळा शहरात रूमवर राहून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना रात्रीचे जेवण देत आहे. सांगली- कोल्हापूर येथील पूर परिस्थिती वेळीही प्रतिष्ठानने तेथील लोकांना मोठी मदत केली होती. आता या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे श्रीराम प्रतिष्ठान म्हणजे करमाळा तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहेत. या सर्व सामाजिक कामाबद्दल प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शुभविवाह प्रसंगी नववधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी. असे आवाहन श्री चिवटे यांनी शेवटी केले आहे.



