मांगी तलाव संदर्भात खा.निंबाळकर यांची महत्वपूर्ण बैठक; १५ जानेवारीपर्यंत तलाव विलिनीकरण बाबत अहवाल येणार- गणेश चिवटे

करमाळा/प्रतिनिधी


माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे करमाळा तालुक्यातील मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलिनीकरण करण्याबाबत चा अहवाल १५ जानेवारी पर्यंत येणार असलेची अधिकृत माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मांगी तलाव कुकडी प्रकल्पात कायमस्वरूपी विलीन करण्याची या भागातील शेतकऱ्यांची वर्षानुवर्षां पूर्वीची मागणी असून या मागणीला आत्तापर्यंत यश आले नाही. परंतु, माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे या भागातील शेतकऱ्यांनी मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन करणे संदर्भात जून- २०२३ मध्ये मागणी केली असता त्यांनी यामध्ये लक्ष घालून कुकडी प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्याचे नियोजन केले. यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून केंद्र सरकारच्या वेबकॉस या संस्थेमार्फत अवघ्या ६ महिन्यात फेरजल नियोजन अहवाल बनवण्याचे काम सुरु असून याबाबत खा. निंबाळकर यांची वेबकॉस संस्थेचे CEO शंभु आझाद यांच्यासोबत काल दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक झाली.
या संस्थेचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत तयार होऊन मांगी तलाव कुकडी प्रकल्पात अधिकृतरित्या कायमस्वरूपी विलीन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन झाल्यानंतर या तलावावर अवलंबून असलेल्या २५-३० गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. करमाळा, जामखेड, कर्जत, परांडा या भागातील बाजार समिती, साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय यांसह सर्वच छोट्या- मोठ्या व्यावसायांना चांगले दिवस येणार आहेत. तसेच करमाळा शहर व परिसरातील लोकांमध्ये व्यवसाय वाढीमुळे आर्थिक भरभराट होणार आहे असे चिवटे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.



