माय मराठी न्युज नेटवर्क


गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावरून इयत्ता नववीतील मुलगी आणि इयत्ता अकरावीतील मुलगा या अल्पवयीन प्रेमी युगुलांनी वैनगंगा नदी मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मूळचे चंद्रपूर येथील असलेल्या या दोघांनी गडचिरोली ला जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपूर तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग या गावातील रहिवासी होते.
आत्महत्या केलेल्या मुलीचे वय अवघे १५ वर्षे तर मुलाचे वय १७ वर्षे असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघे ३ ऑगस्ट पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा खूप शोध घेतला परंतु त्यांचा कुठेही तपास न लागल्याने त्यांनी सदर माहिती स्थानिक पोलिसांना कळवली. ते दोघेही गडचिरोली ला जावून असं काही करतील असे कोणालाच वाटले नव्हते.
बेपत्ता असलेल्या मुलाची व मुलीची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांनी गडचिरोली पोलिसांना दिली होती. त्यांनी देखील या दोघांचा तपास लावण्यास सुरुवात केली असताना त्यांना शिवणी घाटावर एका अल्पवयीन मुलाचा व मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे मृतदेह ब्रह्मपुरी येथील बेपत्ता असलेल्या दोघांचे असल्याची खात्री केली. दोघांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधलेली होती. ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सदर घटनेची माहिती त्या दोघांच्या कुटुंबीयांना समजताच दोघांचे कुटुंब हादरून गेले आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला.




