माय मराठी न्यूज नेटवर्क


अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताचे तालिबानशी संबंध कसे असतील? यावरून तर्कवितर्क लावले जात होते. आता ताज्या घडामोडीत कतारच्या दोहामध्ये भारतीय राजदूताने तालिबान नेत्याची भेट घेतली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या देशात परत येण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. यासोबतच, अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा भारताविरोधात करू नये, अशी भूमिका भारतीय राजदुतांनी मांडली.
भारताने तालिबानशी चर्चा केली असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताने तालिबानशी अधिकृतपणे चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परताव्यावर आणि अफगाणिस्तानबद्दल भारताच्या चिंतांवर या चर्चेचा भर होता. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ३१ ऑगस्ट रोजी कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या दोहा राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास त्सतेकझाई यांची भेट घेतली. तालिबानच्या विनंतीवरून दोहा येथील भारतीय दूतावासात ही चर्चा झाल्याचे भारताने म्हटले आहे.
अलीकडच्या काळात तालिबान नेत्यांनी अनेक वेळा म्हटले आहे की, भारत आमच्यासाठी एक महत्त्वाचा देश आहे. आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणुकीचे स्वागत केले आहे आणि म्हटले आहे की, भारत अफगाणिस्तान मधील प्रकल्पांवर काम करणे सुरू ठेवू शकतो. भारताच्या या समस्यांबाबत, शेर मोहम्मद अब्बास त्सतेकझाई यांनी आश्वासन दिले आहे की, हे सर्व प्रश्न सकारात्मक दृष्टिकोनाने सोडवले जातील.




