
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील पशुधनाची काळजी घेण्यासाठी फिरता पशू दवाखाना सुरु करावा. अशी महत्वपूर्ण मागणी युवासेना ठाकरे गटाचे करमाळा तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी पशू संवर्धन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित मागणीचे निवेदन मंत्री महोदयांना इमेल करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत तालुका पशुधन विकास अधिकारी मनिष यादव यांना समक्ष भेटून देण्यात आली.
या निवेदनात युवासेनेकडुन शेतकरी व पशुधनाच्या हिताच्या विविध महत्वपूर्ण मागण्या केल्या असून यात युवासेनेने म्हटले आहे की, करमाळा तालुक्यात जवळपास दिड लाख पशुधन आहे. मात्र अपुरे कर्मचारी, तोकडी यंत्रणा यामुळे जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अद्ययावत लघू पशू चिकित्सालय नसल्याने रक्त तपासणी, क्ष किरण, सोनोग्राफी यासाठी बाहेर तालुक्यात जनावरे घेवुन जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे. आजारी जनावरांची हेळसांड होत असल्याने जनावरे दगावतात. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना जागेवरच उपचार होण्यासाठी तज्ञ डाॅक्टर व चांगल्या प्रतिचे गोळ्या औषधं उपलब्ध असलेला अद्ययावत फिरता दवाखाना सुरु करावा. शासकीय रूग्णालयात माणसांना मोफत उपचार सुरु केले आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पशूधनावर संपूर्णपणे मोफत उपचार केले जावेत.
करमाळा तालुक्यात काँट्रॅक्ट बेसवर घेतलेल्या डाॅक्टराची नावे, त्यांच्या अखत्यारीत असलेली गावे, मोबाईल नंबर व व्हिजट फिसह उपचारांचे दरपत्रक सार्वजनिक करावे. त्याची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालया समोर लावावी. प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी दवाखान्यात नेमणूक असलेल्या डाॅक्टरांना नेमणूक केलेल्या दवाखान्यात चोवीस तास उपलब्ध राहण्याची सुचना द्यावी. मुक्कामी रहात नसलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. तालुक्यात अनेक बोगस पशू डाॅक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर माजी शिवसेना तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे, तालुका चिटणीस पांडुरंग ढाणे, उपतालुका प्रमुख अभिषेक मोरे, उपशहर प्रमुख बंटी राक्षे, शाखा प्रमुख ओंकार कोठारे, शिवाजीराव माने मयुर तावरे आदींच्या सह्या आहेत.
युवासेनेकडुन आलेल्या निवेदनानुसार पशुधन विभागाकडून तालुक्यातील व दवाखान्यातील डाॅक्टर यांचे नाव, नंबर तसेच दरपत्रक तात्कळ सार्वजनिक करू. फिरता दवाखाना तसेच बोगस डाॅक्टर संदर्भात वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार केला जाईल.
डाॅ. मनिष यादव
पशुधन विकास अधिकारी, करमाळा पशुसंवर्धन विभाग.




