
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील केम आणि जेऊर येथील रेल्वे प्रवाशांच्या मागणीचा विचार करून त्या ठिकाणी कोनार्क एक्स्प्रेस गाडीला थांबा दिलेला असुन, आपण लवकरच पारेवाडी रेल्वे स्थानकावर देखील एका एक्सप्रेस गाडीला थांबा मिळवून देणारच असले बाबतचे ठोस आश्वासन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी फोनवरून दिले असल्याची माहिती ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खा. निंबाळकर यांच्याशी आ. संजयमामा शिंदे व शिवसेना नेते सुर्यकांत पाटील यांनी देखील पारेवाडी स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा देणे बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. पारेवाडी रेल्वे स्थानक व स्थानकाचे शेजारील ३० गावातुन एक्सप्रेस थांब्याची मागणी होत असुन मध्यंतरी येथील नागरिकांनी भव्य मोर्चा देखील काढला होता. या स्टेशन पासुन जेऊर रेल्वे स्टेशन ला जायला तब्बल २७ कि.मी. चा बायरोड प्रवास करावा लागतो. तसेच या स्टेशनवर ट्रायल बेसीसवर तरी गाडीला थांबा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. येथील प्रवाशांची मागणी योग्य असुन, मी पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एका एक्सप्रेस गाडीला थांबा मिळवून देणारच असलेची माहिती खासदार साहेबांनी दिली आहे.
खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा व माढा तालुक्याच्या दौऱ्यावर असुन त्यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनची पुर्तता लवकर होइल. अशी अपेक्षा पारेवाडी, केत्तुर व परिसरातील रेल्वे प्रवाशांनी केली आहे.




