पुणे भागातील धरणांतून उजनीत १० टि एमसी पाणी सोडावे, प्रा. रामदास झोळ यांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

करमाळा/प्रतिनिधी


सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात सध्या अल्प पाणीसाठा असल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून पुणे भागातील १९ धरणातील १० टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणात सोडण्यात यावे. अशी मागणी करमाळा तालुक्याचे नेते प्रा. रामदास झोळ सर यांनी अतुल कपोते कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा प्रशासनाने बार्शी, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा आदी तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले आहेत. या वर्षी उजनी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने सध्या उजनी धरणात फक्त १५ % इतका अतिअल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके, शहर व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, उद्योग व शेतीसाठीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. यामुळे आगामी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनी धरणातील पाणी साठ्यावर सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील उपरोक्त बाबी अवलंबून असताना अतिअल्प राहिलेल्या पाण्याचे नियोजन कसे होणार आहे ?
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करूनच महाराष्ट्र शासनाने अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा कमी असताना देखील येथील धरणांमधुन ८.६ टी एमसी पाणी जायकवाडी धरणात सोडले आहे. पावसाळयात पुणे जिल्ह्यातील ज्या धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी उजनीत सोडले जाते ती सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. त्याच १९ धरणातील १० टि एमसी पाणी जायकवाडी पॅटर्नप्रमाणे उजनीत सोडण्यात यावे. म्हणजे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची भविष्यात उद्भवणारी अडचण दूर होईल. उजनी धरणात १० टि एमसी पाणी सोडण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा. अन्यथा सिंचन भवन पुणे येथे निवेदन दिल्यापासून १५ दिवसांच्या आत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रा. रामदास झोळ सर यांनी दिला आहे.




