शिंदे सरकार नावालाच गतीमान सरकार; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी युवासेनेचा उपोषणाचा इशारा!

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


‘गतीमान सरकार कारभार दमदार’ या नावाने जाहिरातबाजी करून करडो रुपये खर्च करणाऱ्या सरकारच्या कालावधीत शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सोसावा लागत असल्याचा आरोप करमाळा युवासेनेकडुन करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानभरपाई साठी पात्र यादीत नावे असताना नऊ महिने उलटून गेले तरी मदत मिळालेली नाही. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात वादळ व अतिवृष्टी होवुन उरली सुरली पिके उद्ध्वस्त झाली. मात्र अजून देखील करमाळा तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत असून तहसिल कार्यालयात व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून बेजार झाले आहेत.
कारखानदारांकडून एफआरपी कायदा फाट्यावर मारून नऊ महिने झाले तरी नोव्हेंबर महिन्यात गेलेल्या उसाची बिले अदा केली जात नाहीत अनेक आंदोलन मोर्चे करून देखील सरकार मध्ये सामील असल्याने बागल यांच्या मकाई व आमदार पुत्र विक्रम शिंदे यांच्या कमलाई शुगर वर कोणतीच कारवाई होत नाही.
प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची अत्यंत परवड सुरु असुन तलाठी महसूल यांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांचा सर्व डेटा डिलीट झाला आहे. नव्याने सातबारा बॅंक पासबुक आधार कार्ड देवून देखील एक वर्षापासून अनेक शेतकरी या लाभा पासुन वंचित आहेत. जिवंत शेतकरी मृत्यु दाखवण्याचे गंभीर प्रकार देखील घडले आहेत. सततच्या पावसाने नुकसान झालेल्यांना देखील नुकसानभरपाई देणार असल्याची मोठी घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे. मात्र करमाळा तालुक्यातील करमाळा व कोर्टी मंडलातील शेतकऱ्यांचे नुकसान होवुन देखील मदती पासुन वंचित आहेत.
शेतकऱ्यांना होत असलेल्या या मनस्तापाचा आज करमाळा युवासेनेकडुन तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला १४ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांची उसबीलं, अतिवृष्टीचे अनुदान, प्रधान मंत्री सन्मान योजनेतील त्रुटी, यावर तोडगा नाही काढला तर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा तहसिलदार विजयकुमार जाधव यांना निवेदनाद्वारे युवासेनेकडुन दिला आला आहे.
या निवेदनावर शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे, युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे, धरणग्रस्त संघटनेचे उपाध्यक्ष भारत साळुंके, युवासेना शाखाप्रमुख ओकांर कोठारे, उप शाखाप्रमुख मयुर तावरे, हरिश्चंद्र जाधव, लालासाहेब नलवडे, योगेश लोंढे, प्रशांत शेंडे, इंद्रजित शिंदे आदींच्या सह्या आहेत.




