करमाळा/प्रतिनिधी


करमाळा बसस्थानकातून माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे जाणारी एसटी बस गौंडरे व नेरले मार्गे सुरु करावी. अशी मागणी नेरले गावचे माजी सरपंच औदुंबर राजेभोसले यांनी जिल्हा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नेरले (ता. करमाळा) हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे तर गौंडरे गाव साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे. गौंडरे गावात दोन विद्यालय व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. तसेच या गावाजवळच सीना कोळेगाव हे धरण आहे. नेरले गावातील अनेक विद्यार्थी गौंडरे येथे शिक्षणासाठी जातात. तसेच आवाटी, सालसे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे येथील ही अनेक विद्यार्थी गौंडरे येथे येतात. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व नागरिकांना कुर्डवाडी येथे रेल्वेने पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी, करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे- जाण्यासाठी एसटीची सोय नसल्यामुळे अनेक कामे थांबतात.
यामुळे करमाळा कुर्डूवाडी गाडी फिसरे, हिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, नेरले, वरकुटे, कव्हे, बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळ्याला जावी. अशी मागणी नेरले चे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी जिल्हा नियंत्रक साहेब, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासोबतच गौंडरे व नेरले ग्रामपंचायतीचे ठराव व छत्रपती संभाजी महाराज विद्यालय गौंडरे यांचे पत्र निवेदनासोबत जोडलेले आहे.



