
करमाळा/प्रतिनिधी


प्रांत कार्यालयातून भुसापंदन चा दाखला देताना निवाडा दप्तर जिर्ण असल्यास ग्रामपंचायत उताऱ्यावरील भुसापंदन ची नोंद किंवा पुनर्वसन विभागाचा आदेश ग्राह्य धरून भुसापंदन चा दाखला देण्यात यावा. अशा आग्रही मागणीचे निवेदन ठाकरे गटाच्या युवासेने कडुन आज (दि. १२) रोजी प्रांत अधिकारी समाधान घुटूकडे यांना देण्यात आले.
युवासेनेकडुन देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरी मध्ये सुविधा मिळवण्यासाठी धरणग्रस्त दाखला महत्वपूर्ण ठरतो. मात्र निवाडा जिर्ण आहे, जुने रेकॉर्ड उपलब्ध नाही, असे लेखी देऊन भुसापंदन दाखला देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भुसापंदन झाले असताना देखील विद्यार्थ्यांना भुसापंदन दाखला न मिळाल्याने धरणग्रस्त दाखल्यापासून वंचित राहावे लागत आहे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावातील नागरिकांची शेती तसेच राहत्या जागा उजनी धरण निर्मीती वेळी संपादीत केलेल्या आहेत. ग्रामपंचायत च्या उताऱ्यावर संपादनाचा स्पष्ट उल्लेख तसेच संबंधिताकडे पुनर्वसन विभागाने पर्यायी जागा व जमीनी दिलेल्या वाटपाचे आदेश आहेत. तरी देखील भुसापंदन दाखला दिला जात नाही. विद्यार्थ्यांना भुसापंदन दाखल्यापासून वंचित ठेवणे म्हणजे हा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन उजनी धरणासाठी जागा किंवा शेत जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांचा निवाडा जिर्ण असेल किंवा रेकॉर्ड मिळून येत नसेल तर संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या ग्रामपंचायत उताऱ्यावरील नोंदी किंवा पुनर्वसन विभागाने जागा वाटपाचा दिलेला आदेश ग्राह्य धरून तात्काळ भुसापंदन दाखाला देण्यात यावा असे युवासेने म्हटले आहे.
या संबंधात १५ दिवसात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास कुर्डूवाडी येथील प्रांत कार्यालया समोर युवासनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील युवासनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, शाखाप्रमुख ओंकार कोठारे, उप शाखाप्रमुख प्रमुख मयुर तावरे, अविनाश गाडे विनोद पाटील आदिंच्या सह्या आहेत.
संपूर्ण माहिती घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू-
भुसापंदन दाखल्या संदर्भात निवाडा जिर्ण असेल किंवा रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर काय मार्ग काढता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली करू.
श्री. समाधान घुटूकडे
उपविभागीय अधिकारी, माढा.



