पीकविमा भरण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना जास्त पैसे देऊ नयेत- नितीन झिंजाडे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकांना अतिरिक्त पैसे देऊ नयेत. असे आवाहन भाजपाचे करमाळा तालुका सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले आहे.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, राज्यातील भाजप, सेना, राष्ट्रवादी या महायुती सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत फक्त एक रुपयात शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कवच जारी केले आहे. उर्वरित विमा हफ्ता रक्कम राज्य सरकारने भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. पीक विमा भरताना विमा कंपन्या सामूहिक सेवा केंद्र धारकांना प्रती अर्ज ४०/- रु देत असते. परंतु, काही सीएससी चालक शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपने अतिरिक्त १०० ते २०० रुपये घेत आहेत. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खर्चिक झाली असून यामुळे शासनाच्या सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा मूळ हेतू बाजूला राहत आहे.
सामूहिक सेवा केंद्र धारकांना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेता येणार नाहीत. याबाबत कृषी आयुक्तालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट आदेश दिले आहेत. सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) चालक अतिरिक्त पैसे मागत असतील किंवा पीक विमा भरणेसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे सहकार्य करत नसतील तर तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांचेकडे तक्रार करावी. असे आवाहन झिंजाडे यांनी केले आहे.



