
करमाळा/प्रतिनिधी


भारत देश आणि देशातील तरुण पिढी निरोगी रहावी व पर्यावरनाचा होत चाललेला ह्रास थांबावा यासाठी वीट येथील दादाश्री फाऊंडेशनच्या वतीने जूलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये एक लाख अकरा हजार अकराशे अकरा झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी दादाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष काका काकडे यांनी ८०० कि. मी. सायकल प्रवास करत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांची भेट घेतली.
काकडे यांनी १७ एप्रिल रोजी प्रवास सुरू केला होता. त्यानंतर २४ एप्रिल ला ते आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील ताडापल्ली येथे पोहोचले. रस्त्याने जाताना विविध ठिकाणी त्यांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी दररोज १०० ते ११० किलोमीटर अंतर पार करत वीट (ता. करमाळा) येथून सुरू केलेला प्रवास ७ दिवसात पूर्ण करत आंध्र प्रदेश येथील ताडापल्ली येथे थांबवला. सायकल प्रवास करताना काका काकडे यांना IAS बालाजी मंजुळे यांनी वेळो-वेळी मार्गदर्शन केलं व भेटीचा मार्ग सोप्पा केला. हा सायकल प्रवास कोणतीही बँकअप गाडी सोबत न घेता पूर्ण केला.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी भेटी दरम्यान सायकलवर कसं आलात, त्रास झाला का, परत असा प्रवास करू नका, घरी कोण कोण असते, समाजकार्याच्या व्यतीरीक्त अजुन काय करता अशी विचारपूस करत भविष्यातील अडचणीच्या काळात संपर्क साधण्याचे आवाहन केले. वृक्षारोपण व जेऊर (ता. करमाळा) येथील आयएएस अधिकारी आंध्रप्रदेश राज्य पंचायत राज समिती अतिरिक्त सचिव बालाजी मंजूळे यांच्या मातोश्रींच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी जूलै महीन्यात उपस्थित राहणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
दादाश्री फाऊंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये २०३ जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील विविध भागात २५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन फाऊंडेशन च्या माध्यमातून केले असून यामध्ये ५००० नागरीकांनी सहभाग घेत रक्तदान केले आहे. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले आहे. तसेच क्रिकेट, खोखो सह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.



