शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; युवासेनेचे फडतरे यांची निवेदनाद्वारे मागणी

करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळ वार्याने झालेल्या पिकांसह इतर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल द्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी, पपई, आंबा, मका या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच झाडांखाली अडकुन गायी, म्हशींचे जीव गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे छप्पर, पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल, कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तात्काळ पंचनमाने करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. असे फरतडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहचले नाही. आधार नंबर, खाते नंबर, गट नंबर यामध्ये झालेल्या किरकोळ चुकांमुळे शेतकरी अनुदाना पासुन वंचित आहे. बॅंकेत, तहसिल कार्यालयात हेलपाटे मारून मदतीचे घोडे कुठे अडकले आहे असा सवाल शेतकरी विचारत आहे.
अतिवृष्टी अनुदानाची वाट पाहत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अशा वेळी गावचावडीवर किंवा ठराविक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून पंचनमाने न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे काम प्रशासनाने करावे असे फरतडे यांनी म्हटले आहे.




