
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील नेरले ते गौंडरे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. अशी मागणी नेरले गावचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नेरले ते गौंडरे या दोन गावांमधील अंतर ६ कि.मी. असून गौंडरे येथे दोन विद्यालय व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. तसेच सिना कोळगाव प्रकल्प जवळ असल्यामुळे येथे शेतकरी व विद्यार्थ्यांची सतत रहदारी असते. हा रस्ता अंदाजे सन २००८ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून झाला आहे. त्यानंतर अद्याप पर्यंत रस्ता दुरुस्तीचे ही काम केले गेले नाही.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबर राहिले नाही. तसेच खडी उचकटलेली असल्यामुळे पायी देखील नीट चालता येत नाही. गेल्या दोन वर्षांत या रस्त्यावर जवळपास ५० ते ६० लहान मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्याचा सर्वाधिक त्रास शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सायकल चालवणाऱ्या विद्यार्थ्यांना तर तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
सुरुवातीलाच या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. त्यावेळेस मी संबंधितांना तक्रार दिली होती. परंतु टक्केवारी घेऊन बिले काढल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे. टक्केवारीमुळे रस्त्यांचे काम पाच वर्षे देखील टिकत नाही, ही शोकांतिका आहे.
औदुंबरराजे भोसले
माजी सरपंच, नेरले




