-->
करमाळाराजकिय

अर्थसंकल्पात किती निधी मंजूर यावर आमदार शिंदे गप्प का? पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांचा सवाल

 

करमाळा/प्रतिनिधी

 

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे आमदारांच्या वार्षिक परिक्षेचा निकाल असून मंजूर निधी बाबत आ. संजयमामा शिंदे यांनी त्यांचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडावे, असे आव्हान पाटील गटाचे प्रवक्ते सुनील सदाशिव तळेकर यांनी केले. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून आठवडा उलटून गेला तरी आमदार महोदयांनी करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी किती निधी मंजूर करुन घेतला हे अजून जनतेला सांगितले नाही. एकोणीस वर्षे रखडलेली ही योजना माजी आमदार नारायण पाटील यांच्या सततचा पाठपुरावा व अथक प्रयत्नांनंतर कार्यान्वित झाली. तालुक्याच्या पुर्व भागातील दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारी ही योजना आज तिचे उद्दीष्ट पुर्ण करु शकत नाही.

 

सन २०१९ पासुन पुढे विद्यमान आमदार हे आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहेत. एक गुंठाभर वाढीव क्षेत्र या तीन वर्षात ओलिताखाली आले नाही आणि एक रुपयाचाही निधी या योजनेसाठी गेल्या तीन वर्षात आणला गेला नाही. आजमितीस केवळ कॅनालच्या म्हणजेच मुख्य चारी आणि काही ठिकाणी उपचारी यांच्या आसपास असणारे बोटावर मोजता येईल एवढेच क्षेत्र ओलिताखाली येत आहे. सुप्रमाचा ढोल बडवून झाला, सन २०२४ पर्यंत दहिगाव उपसा सिंचन योजना पुर्ण क्षमतेने व पुर्ण क्षेत्र ओलिताखाली आणून चालू होईल ही पोकळ घोषणाही देऊन झाली.आता आमदार महोदयांनी जनतेसमोर आपण निष्क्रिय असल्याची कबूली देण्यासाठी एखादा गावभेट दौरा आखावा असा हल्लाबोल तळेकर यांनी केला.

 

करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांची ओळख सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी आहे. विशेषतः राज्यसभा व विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकी नंतर तर आ. संजयमामा शिंदे उभ्या महाराष्ट्राला परिचीत झाले. एकीकडे सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे. परंतू तरीही राज्याच्या अर्थसंकल्पातून विकासनिधी खेचुन आणण्यात सोलापूर जिल्ह्यात त्यांचा शेवटचा क्रमांक असावा ही बाब सर्वांनाच आश्चर्य वाटायला लावणारी अशी असल्याचा मार्मिक टोलाही प्रवक्ते सुनील सदाशिव तळेकर यांनी लगावला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close