-->
करमाळासामाजिक

वंदे-भारत एक्सप्रेस चालु झाल्याचा आनंद; परंतु सर्वसामान्यांसाठी काय? – ॲड. अजित विघ्ने

१९९७ पासून च्या मागणीला कधी मिळणार यश..?

 

करमाळा/प्रतिनिधी

 

सोलापुर ते मुंबई प्रवासाकरिता नव्याने वंदे- भारत एक्सप्रेस रेल्वे चालु झालेली असुन सोलापुर शहर, कुर्डुवाडी आणि शहरी भागातील उदयोजकांकरीता ही एक्सप्रेस नक्कीच चांगली आहे. या एक्सप्रेस च्या तिकीटांचा विचार करता, या गाडीतुन सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी काय? असा सवाल उपस्थित करीत सर्वसामान्यांसाठीही गरीबरथ एक्सप्रेस गाडी सुरू करावी. अशी मागणी केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.

 

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, वस्तुतः रेल्वे मंत्र्यांनी सर्व सामान्य प्रवाशांचा विचार करून गरीबरथ एक्सप्रेस सुद्धा चालु करायला पाहीजे. परंतु तळागाळातील लोकांना नेहमीच दुय्यम वागणुक मिळताना दिसत आहे. रेल्वे मंत्री लालुप्रसाद यादव यांनी त्यांचे कार्यकाळात रेल्वेचे तिकीट कमी करून उत्पन्न वाढविले होते. परंतु आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. पारेवाडी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील प्रवासी बांधव १९९७ पासुन पारेवाडी येथे एक्सप्रेस गाडीला थांबा मिळावा म्हणून मागणी करत आहेत. परंतु अनेक वेळा फक्त आश्वासने मिळतात प्रत्यक्षात मात्र अजून एकाही एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला नाही.

 

आजही या स्टेशनवरील रेल्वे टिकीटाचे बुकींग चांगले होते. रेल्वे रोको आंदोलन करूनही आजपर्यंत दाद दिलेली नाही. त्यामुळे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा ही आमची मागणी कायम असुन याबाबत आमदार संजयमामा शिंदे, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे. वंदे भारत एक्सप्रेस सोलापुर, पुणे, मुंबई येथील प्रवाशांच्या सेवेसाठी योग्य आहे. अशीच एखादी एक्सप्रेस सर्वसामान्य प्रवाशांनसाठी असावी आणि त्या गाडीला पारेवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा अशी आमची मागणी आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close