
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मकर संक्रांतीच्या आत मदत करा अन्यथा तिव्र आंदोलन करु असा इशारा ठकारे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रशासनाला दिला आहे. फरतडे यांनी या संदर्भांचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ईमेल वरती पाठवले आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील उडीद, सूर्यफूल, मका, केळी, द्राक्षे, भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. कोरोनानंतर सावरलेला शेतकरी या अस्मानी संकटाने हतबल झाला होता. सरकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असताना फक्त नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. मात्र पंचनामे करून दिड महिना उलटला तरी अजून शेतकऱ्यांना फुटक्या कवडीची मदत मिळालेली नाही.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या अतिवृष्टीत कांदा, तुर, मका, उडीद, केळी, भाजीपाला यासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीमुळे हिरावला गेला होता. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेलाच मात्र अनेक शेतकऱ्यांची शेतं वाहुन गेली, अनेकांच्या जमिनीला पाणी लागले, त्यामुळे रब्बीच्या हंगामावर देखील विपरीत परिणाम झाला. वापसा होवुन पेरणी योग्य शेती होण्यास विलंब झाल्याने ज्वारी, हरभारा, गहू, करडी या पिकांची उगवण झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून देखील जिरायत भागातील पेरण्या वाया गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थिक चक्र पार कोलमडे असून पिककर्ज, खासगी सावकारी या पाशात शेतकरी पुन्हा अडकण्याची भिती आहे.
मकर संक्रातीचा सण तोंडावर आला आहे. महिलांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या महिलांना संक्रात साजरी करण्यासाठी पुन्हा हातउसणे करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे मकर संक्राती सणाच्या अगोदर मदत करुन शेतकऱ्यांची संक्रात गोड करावी अशी मागणी या निवेदनात युवासेनेकडुन करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, युवासेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, युवा सेना शहरप्रमुख समीर परदेशी, उपतालुकाप्रमुख समाधान यादव, तालुका चिटणीस पांडुरंग ढाणे, प्रसाद निंबाळकर सोशल मिडीया समन्वयक अजय साखरे, अविनाश गाडे, भाऊ मस्तुद, दर्शन कुस्कर, कल्पेश राक्षे आदींच्या सह्या आहेत.



