-->
करमाळाकृषी विषयकराजकियराज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आदिनाथचे मोळीपुजन; पालकमंत्र्यासह आरोग्यमंत्री ही राहणार उपस्थित

आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ सुरू होणार

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करमाळा तालुक्यात रविवार दि. २५ डिसेंबर रोजी येणार असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन व गव्हाणीत मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे यांनी दिली आहे. 

 

मागील तीन वर्षांपासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत होता. कामगार तसेच इतर देणी वाढल्याने कारखाना बंद करण्याची वेळ कारखान्याच्या संचालक मंडळावर आली होती. दरम्यानच्या काळात आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव करण्यात आला होता. सदर ठरावात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष घातले होते. परंतु, एनसीडीसी बँकेने त्यात विरोध दर्शवल्याने कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया थांबली होती. यावेळी करमाळा तालुक्यातील सभासदांनी आदिनाथ बचाव कृती समितीची निर्मिती करून बारामतीच्या रोहित पवारांना कारखाना भाडे करारावर देण्यासाठी विरोध केला.

 

त्यानंतर सत्ता बदल झाला आणि भाजपा व शिंदे सरकार सत्तेत आल्यावर मंत्री तानाजी सावंत यांनी सदरच्या कारखान्यात दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या हेतूने लक्ष घातले व कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. या वेळी सभासदांनी ही कारखाना हा भाडेतत्त्वावर न देता सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही भूमिका घेतल्याने अखेर कारखाना हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार बँकेने दिलेल्या शर्ती व अटीनुसार काही रक्कम भरून कारखाना सुरू करण्याची परवानगी मिळाली.

 

सदरची रक्कम जुळवाजुळी करताना सभासद व इतरांकडे सहकार्य मागितले जात होते. त्यामध्ये मोलाचा वाटा हा मंत्री तानाजी सावंत यांनी उचलला व मोठी रक्कम कारखान्याला चालू करण्यासाठी सहकार्य म्हणून देऊ केली. कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. तर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनीही जोरदार ताकद लावली होती. माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल यांच्या कन्या आदिनाथच्या संचालिका रश्मी बागल यांनी ठाम भूमिका घेऊन आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेऊन बारामती अग्रोचा करार रद्द करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रश्मी बागल व नारायण पाटील यांनी एकत्रित येऊन कारखाना खाजगी तत्त्वावर चालू करण्यासाठी पुढाकार घेतला.

 

या पार्श्वभूमीवर आता कारखाना सुरू होत आहे. मोळी टाकण्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठेवण्यात आला आहे. त्या निमित्ताने ते रविवार (दि. २५) रोजी करमाळ्यात येत आहेत.

 

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत असून बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक करमाळ्यात होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close