
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांमध्ये सध्या लम्पी या जनावराच्या साथीच्या आजाराने थैमान घातलेले आहे. यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी आज करमाळा येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तथा सनियंत्रण अधिकारी लम्पी चर्मरोग डॉ. एस. एस. भिंगारे हे उपस्थित होते.
सध्या ६४०३६ पशुधन करमाळा तालुक्यात असून यापैकी १४०१ जनावरांना लम्पी ची बाधा झालेली असून यापैकी ५७४ जनावरे उपचार घेऊन बरी झालेली आहेत. सद्यस्थितीत ८२७ जनावरावरती उपचार सुरू आहेत. तर ७४ जनावरांचा मृत्यू या लम्पीने झालेला असून ५६१०० जनावरांना लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळेस डॉ. शिंदे यांनी दिली.
यानंतर पशुसंवर्धन विभागाला येणाऱ्या अडचणी संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की, करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण केंद्राची आवश्यकता आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन पशुवैद्यकीय सेवा देण्यास डॉक्टरांना विलंब होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात यावे. तसेच जनावरांसाठी दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यात यावी. औषधासाठीचा निधी वाढवून द्यावा व त्याचा पुरवठा वेळेवर व्हावा.
जनावरे मयत झाल्यानंतर त्यांचा पंचनामा करण्यासाठी गावपातळीवरील तलाठी आणि ग्रामसेवक यांचे सहकार्य मिळण्यासाठी आपले स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत असे निवेदन दिले आहे.



