
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा एम आय डी सी मधील भूखंडाचे दर सोलापूर एम आय डी सी पेक्षा जास्त असून हे दर कमी करून तात्काळ भूखंडाचे वाटप सुरू करावे. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. मुंबई येथील उदय सामंत यांच्या निवासस्थानी महेश चिवटे यांनी भेट घेऊन ही मागणी केली आहे.
यावेळी करमाळा एम आय डी सी मध्ये झालेल्या मूलभूत सुविधा विषयी माहिती दिली. करमाळा एम आय डी सी विकसित करण्यासाठी उजनी धरणावरून किंवा सीमा कोळगाव प्रकल्पामधून स्वतंत्र पाईपलाईन च्या माध्यमातून २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे. उपलब्ध असलेल्या भूखंडामध्ये तात्काळ डांबरी रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट याचे टेंडर करून कामकाज करावे. सध्या करमाळा एम आय डी सी मध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी शासनाने एक विहीर खोदण्यास मंजुरी दिली आहे. मात्र या विहिरीचे पाणी सर्व प्रकल्पांना पुरणार नाही.
सध्या झालेले रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्यामुळे तयार केलेले रस्ते उध्वस्त झाल्याचे उद्योग मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. एम आय डी सी मधील भूखंडाचे दर प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे उद्योजक येथे येण्यास टाळाटाळ करत आहेत. सोलापूर एम आय डी सी पेक्षा करमाळा येथील दर जास्त आहे. प्लॉट वाटप करण्यापूर्वीच अजून १५ टक्के ची दरवाढ केली आहे. या भावात तर जमिनी विकत मिळतात अशी तफावत आहे.
एम आय डी सी विकसित करायची असेल तर भूखंडाचे दर कमी करणे गरजेचे आहे. अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व विषयासंदर्भात एक विशेष बैठक लावून हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले.



