ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करा; आ. संजयमामा शिंदे यांचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडल्यामुळे व परतीच्या पावसाने हाहाकार केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी असे निवेदन आ. संजयमामा शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना दिले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनाही माहितीसाठी दिली आहे.
सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करमाळा माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दि.६ ऑक्टोबर पासून ते १२ ऑक्टोबर पर्यंत सालसे, केम, अर्जुननगर, जेऊर, कोर्टी, केतुर, उमरड या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून सदर गावामध्ये पंचनामे सुरू आहेत. सदर मंडळामध्ये सरासरीच्या पाचपट अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, उडीद, तूर, मका, सूर्यफूल, केळी, भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.
करमाळा तालुक्यामध्ये जून ते १२ ऑक्टोबर २०२२ अखेर सरासरीच्या तुलनेने १७० टक्के पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर पडणार असून ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांच्या लागवडी कमी होण्याची शक्यता आहे.
तरी करमाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी. असे पत्र आमदार शिंदे यांनी दिले आहे.



