-->
करमाळाराजकियसामाजिक

सिना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी नेरले तलावासाठी आजपासून सुरू; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

सिना कोळेगाव प्रकल्प प्रत्येक वर्षी शंभर टक्के भरतोच असे नाही. त्यामुळे या प्रकल्पावरती आधारित असलेली करमाळा बाजूकडील उपसा सिंचन योजना वर्षानुवर्षे बंद स्थितीमध्ये राहते. परंतु २०२० पासून धरण १००% भरल्यामुळे २०२० व २०२१ मध्ये कोळगाव धरणाचे ओव्हर फ्लो पाणी नेरले व गौंडरे येथील तलावाला दिले होते. यावर्षीही म्हणजे २०२२ मध्ये कोळगाव धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे या धरणातून नेरले तलावासाठी आजपासून पाणी सुरू करण्यात आले असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

सन २०१७ पासून जवळपास चार वर्ष ही योजना बंद होती. थकित वीज बिलामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केलेला होता. जलविद्युत विभाग, यांत्रिकी विभाग यांची उपकरणे वर्षानुवर्षे बंद स्थितीत असल्यामुळे अतिशय खराब परिस्थितीमध्ये होती. सिव्हिल विभागाचा कॅनॉल पावसाच्या पाण्यामुळे फुटला होता. झाडे, झुडपे वाढल्यामुळे तसेच भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत, रहदारीसाठी पूल बनवलेला नाही, यामुळे लोकांनी जागोजाग कॅनॉल बुजवलेला होता. अशा स्थितीत कोळगाव प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यासाठी मिळविणे म्हणजे दिवास्वप्नच होते.

परंतु, सिना कोळेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत योजना कार्यान्वित करा व वाहून जाणारे पाणी लाभक्षेत्रातील गावांना द्या अशा सूचना दिल्या होत्या. तुम्हाला जिथे कुठे अडचण असेल तिथे मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना सांगा, तुमच्या अडचणी सोडवू. परंतु माझ्या तालुक्यातील गावांना कोळगाव प्रकल्पाचे पाणी मात्र प्राधान्याने मिळाले पाहिजे असे सूचित केले होते.

त्यानुसार संबंधित विभागांनी वीज बिल भरणा करण्यापासून ते कॅनल दुरुस्ती, पंपांची दुरुस्ती, वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवरती पूर्ण करून कोळगाव प्रकल्पाचे ओव्हर फ्लो पाणी २०२० पासून करमाळा तालुक्यातील नेरले तलावासाठी दिले जात आहे. नेरले तलावातील पाण्याचा लाभ नेरले या गावाबरोबरच सालसे, आळसुंदे व वरकुटे या गावातील शेतकऱ्यांनाही या पाण्याचा फायदा होत असतो. नेरले तलावावरती जवळपास एक हजार हेक्टर उसाची लागवड अवलंबून आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून नेरले तलावाला पाणी सुरू झाल्यामुळे या भागातील शेतकरी समाधान व्यक्त करून आमदार शिंदे यांचे आभार मानत आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दि. ०१ ऑक्टोबर रोजी गौंडरे चे माजी सरपंच सुभाष हनपुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेरले गावचे युवा नेते माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, कोळगाव प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस. जी. चौगुले, शाखा अभियंता डी. आर. कांबळे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close