
करमाळा/प्रतिनिधी


अकलूज, पंढरपूर, करमाळा व बार्शी परिसरातील ज्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी आॕनलाईन अर्ज केले होते, परंतू ते प्रमाणपत्र नेण्यासाठी येऊ शकले नव्हते त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाकङुन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवङ्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
शनिवार दि. १७ सप्टेंबर ते रविवार दि. २ आॕक्टोंबर २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यातील दि. २२, २४, २८ व २९ सप्टेंबर रोजी बार्शी येथिल ग्रामिण रुग्णालयात, तर दि. २३, २७, ३० सप्टेंबर व १ ऑक्टोंबर रोजी करमाळा, दि. २२, २७, २९ सप्टेंबर व १ ऑक्टोंबर रोजी पंढरपूर आणि दि. २३, २४, २८ व ३० सप्टेंबर रोजी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
सदर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबीर हे अकलूज येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश गुडे, बार्शी येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन कदम, पंढरपूर येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश माने तसेच करमाळा येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. अमोल डुकरे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. तसेच या शिबिरामध्ये अकलूज येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल मिसाळ आणि करमाळा येथील डॉ. भोसले हे काम पाहणार आहेत.
यावेळी सोबत येताना ऑनलाईन नोंदणी केलेली पावती, आधार कार्ड, रेशन कार्ड, पुर्वी उपचार घेतलेली सर्व कागदपत्रे घेऊन यावीत. दिव्यांगांना महत्वाची सुचना अशी की, वरील चार ठिकाणी फक्त अस्थिव्यंग दिव्यांगांनाच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.




