
माय मराठी न्यूज नेटवर्क


महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्ये च्या दिवशी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र, आज या बैलपोळा सणादिवशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला.
पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेतील फुलंबी तालुक्यातील जळगाव मेटे या गावात घडली आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरीनाथ कचरू काळे (वय ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय१८) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत.
बैलपोळा असल्याने बैल धुण्यासाठी पंढरीनाथ काळे हे पुतण्या रितेश आणि पवन यांना सोबत घेऊन शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले होते. बैल धुताना अचानक पंढरीनाथ यांना बैलाने झटका दिला. हा झटका अतिशय जोराचा असल्याने त्यांचा तोल गेला आणि ते तलावात पडले. काका तलावात पडल्याचे पाहून पुतण्या रितेशने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली.
रितेश आपल्या काकांना वाचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बैल धुण्यासाठी गेलेल्या या चुलत्या पुतण्याला आपला जीव गमवावा लागला आहे.




